गोव्यातील मद्याची अवैध वाहतूक : 50 लाखांचा मुद्देमाल
मोरगाव : गोवा राज्यात विक्रीस असलेल्या मद्याची अवैध वाहतूक करणारा ट्रक निरा (ता.पुरंदर) येथे राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्रमांक दोनने ताब्यात घेतला असून 480 बॉक्स असलेली अवैध दारु व ट्रकसहीत सुमारे पन्नास लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन विभागाने ताब्यात घेतला आहे. गोवा राज्यात परवानगी असलेल्या व्ळिस्की व रॉयल चॅलेंजर दारु घेऊन ट्रक (एम.एच.18 ए.ए.8355) येत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्काच्या भरारी पथक क्रमांक दोनला समजल्यानंतर सापळा लावून निरा गावच्या हद्दीत निरा- लोणंद रस्त्यालगत असलेल्या ज्ञानेश्वर महाराज, विसावा येथे संबंधित ट्रक थांबविण्याच्या या सूचना देण्यात आल्या. ट्रकची तपासणी केली असता सुरवातीला दोनशे लिटरचे मोकळे बॅरल आढळून आले. अधिक तपासणी केली असता ट्रकमध्ये रॉयल ब्लॅक व्हिस्की 180 मिली क्षमतेचे 30 बॉक्स, इम्पेरीयल बल्यू व्हिस्कीचे 275 बॉक्स, रॉयल चॅलेंजरचे 50 बॉक्स , ट्युबर्ग स्ट्राँग प्रीमिअम बियरचे 75 बॉक्स, किंग फिशर स्ट्राँग प्रीमियमचे 500 मिली क्षमतेचे 50 बॉक्स असे एकूण 480 बॉक्स ताब्यात घेतले आहे . याचबरोबर ट्रकसोबत असणारी ईको गाडी (जीजे.1 केवाय. 9848 ) ताब्यात घेतले आहे. वाहनासह एकूण 49,09,600 रुपयांचा मुद्देमाल व राजेश लक्ष्मण लोहार (वय 42 हिसाळे, जि.धुळे), सुखविंदरसिंग मलकितसिंग ओजला ( वय 25 कर्तापुर, ता.घमेला, जि.जालंधर, पंजाब), राजु सुरसिंग सोलंकी (वय 36, रा. गायत्री आश्रम जांभली ता. शेंदवा जि.बडवाणी मध्यप्रदेश) व शैलेशकुमार रामकृष्ण कौरी (25, रा.अहमदाबाद, गुजरात) यांना ताब्यात घेण्यात आले.