विधवा महिलेवर पोलिस निरीक्षकाने केला बलात्कार
पसार निरीक्षक अरविंद भोळेचे अखेर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी केले निलंबन
नागपूर : फेसबुकवरून ओळख वाढवत विधवा महिलेशी लग्न करून तिचे शोषण केल्याप्रकरणी गट्टीखदान पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक अरविंद भोळेविरुद्ध अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपी गुन्हा दाखल झाल्यानंतर पसार झाला असून कसून त्याचा शोध सुरू आहे तर भोळे यांचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी निलंबन केले आहे.
आरोपी निरीक्षकाचे अनेकांशी संबंध
पीडित महिला मूळ अमरावतीची असून 2010 मध्ये पतीच्या मृत्यूनंतर ती एकाकी झाली. 26 जानेवारी 2019 मध्ये फेसबुकवर तिची भोळेसोबत ओळख झाली व चॅटिंगदरम्यान भोळेने तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्या मुलाचाही स्वीकार करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे महिलासुद्धा लग्नासाठी तयार झाली. 8 नोव्हेंबर 2020 रोजी आर्वीनजीकच्या (जि. वर्धा) श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे त्यांनी लग्न केले. त्यानंतर ते नंदनवनमध्ये भाड्याने राहू लागले. नंतर भोळेच्या संपर्कातील महिला भेटीला येऊ लागल्याने महिलेेने चौकशी केली असता तो आधीच विवाहित असल्याचे उघड झाले. त्यामुळे तिने त्याला धारेवर धरले. भोळेचे अनेक महिलांसोबत संबंध असल्याचे उघड झाल्याने या दोघांमधील वाद टोकाला गेला. महिलेने काही पोलीस अधिकार्यांची भेट घेऊन भोळेच्या लीला त्यांना ऐकवल्या. दरम्यान, वैफल्यग्रस्त झालेल्या महिलेची व्यथा काहींनी पोलीस आयुक्तांच्या लक्षात आणून दिला. आयुक्तांनी लगेच गिट्टीखदान पोलिसांना भोळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक भोळेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, भोळे याने कारवाईच्या भीतीपोटी आजारी रजेचा पर्याय निवडला असला तरी प्रकरणाचा बोभाटा झाल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शनिवारी सायंकाळी त्याच्या निलंबनाचा आदेश काढला.







