सैराटची पुनरावृत्ती : प्रेमविवाह केलेल्या तरुणाचा खून : आई-वडीलही गंभीर जखमी


बोरविहिरमधील घटना : तरुणीच्या दोघा भावांसह वडिलांना अटक

नवापूर : मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणाचा खून करून त्याच्या आई-वडीलांवरही चाकूने हल्ला करण्यात आल्याची घटना बोरविहिर, ता.नवापूर येथे घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत अजय राजाराम गावीत (22, बोरविहिर) या तरुणाचा मृत्यू झाला तर त्याची आई सावित्रीबाई राजाराम गावीत व वडील राजाराम नुरजी गावीत हे जखमी झाले. खून प्रकरणी तरुणीचे भाऊ संदीप सखाराम गावीत (25) व समूवेल सखाराम गावीत (27) व वडील सखाराम नरसी गावीत (48) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

प्रेमविवाह केल्याचा राग अनावर
पोलिसांच्या माहितीनुसार, अजय गावीतने प्रेमसंबधातून विवाह केल्याचा राग तरुणीच्या वडिलांसह तिच्या भावांना असल्याने मुलीच्या वडीलांसह दोघा भावांनी शुक्रवारी रात्री अजय राजाराम गावीत यांच्या घरात बेकायदा प्रवेश केला. आरोपी संदीप सखाराम गावीतने आपल्या हातातील चाकू अजय गावीतच्या छातीत खूपसला तर आरोपी सखाराम नूरजी गावीत ायांनी मयत युवकाची आई सावित्रीबाई राजाराम गावीत यांच्या पोटात चाकू खूपसल्याने त्या गंभीर जखमी झाल्या तसेच समूवेल सखाराम गावीत याने मयत युवकाचे वडील राजाराम नूरजी गावीत यांना लाकडी काठीने मारहाण केल्याने ते देखील गंभीर जखमी केले.

डॉक्टरांनी युवकास केले मृत घोषीत
या घटनेनंतर ग्रामस्थांनी अजयसह त्याच्या आई-वडिलांना रक्तबंबाळ अवस्थेत नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी अजयला मृत घोषित केले. सावित्रीबाई गावीत या गंभीर जखमी असून त्यांच्यावर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले तर वडील राजाराम गावीत यांच्यावर नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार
सुरू आहेत. राजाराम गावित यांच्या फिर्यादीवरून नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयीत आरोपी संदीप सखाराम गावीत (25), समूवेल सखाराम गावीत (27), सखाराम नरसी गावीत (48 तिघे रा.बोरविहीर) यांना रात्रीच पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनी अटक केली.बोरविहीर गावात शांतता असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. नंदुरबार फॉरेन्सिक पथकानेही घटनास्थळ रक्ताचे नमुने, ठसे घेतले व घटनेची माहिती जाणून घेतली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !