अखेर सहा.निरीक्षक सचिन वाझे यांचे निलंबन !
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांचे अखेर निलंबन करण्यात आल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी वाझे यांना अटक करण्यात आल्यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना 25 मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. सचिन वाझेंचं पोलीस सेवेतून दुसर्यांदा निलंबन झाले आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकार्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.
कटात अनेकांचा सहभागाची शक्यता
सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली तसेच अंबानींच्या घराजवळ कार नेऊन ठेवण्यामागील उद्देश काय होता? भीती दाखवून त्यांना काय साध्य करायचे होते, याचा तपास सुरू आहे. केवळ स्वतःच्या हिमतीवर वाझे इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वरदहस्त सल्याचा अधिकार्यांना संशय आहे. अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे पांढर्या रंगाची इनोव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होती. ही गाडी क्राईम ब्रँचच्याच वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)ची असल्याचे स्पष्ट झाले आहे.







