माजी पोलिस आयुक्तांची सर्वोच्च न्यायालयात धाव
शंभर कोटींच्या आरोपाची चौकशीची केली मागणी
मुंबई : गृहमंत्र्यांवर शंभर कोटी रुपये महिन्याला वसुलीचे आरोप करणार्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंगांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप असलेले पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविले होते. यामध्ये निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याला देशमुखांनी मुंबईतील पब, बार आदी आस्थापनांकडून महिन्याला 100 कोटी रुपये वसुलीचे काम दिले होते. गृहमंत्री पोलिसांवर दबाव टाकत असल्याचे परमबीर यांनी मुख्यमंत्री, शरद पवार, अजित पवारांना सांगितले होते, असा आरोप केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या या आरोपांची चौकशी व्हावी म्हणून होम गार्डचे महासंचालक परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे मागणी केली आहे. परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून केल्या जाणार्या भ्रष्टाचाराची निःपक्षपाती आणि योग्य सी.बी.आय.चौकशी करण्याची मागणी केली आहे. याचिकेत परमबीर सिंह यांनी आपली बदली चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्दतीने करण्यात आल्याचा आरोप केला आहे. किमान दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच आपली बदली झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याचिकेत परमबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानी प्रकरणात तपास योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा याची आपण खात्री केली होती. याशिवाय एन.आय.ए.कडून होणार्या तपासात कोणताही अडथळा आणला नव्हता. आकसापोटी आपली बदली करण्यात आली असून केवळ अंदाज आणि पूर्णपणे शक्यतांच्या आधारे निर्णय घेण्यात आल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.







