मध्य रेल्वेतर्फे ऑटोमोबाईल उत्पादनांची विक्रमी वाहतूक
फेब्रुवारी 2021 मध्ये रेल्वेने 32 रॅक केले लोड : चालू वर्षात 146 टक्के लोडींगमध्ये वाढ
भुसावळ : मध्य रेल्वेने क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) स्थापीत केले या माध्यमातून फेब्रुवारी महिन्यात तब्बल 32 रॅक लोड झाले आहेत तर यंदाच्या वर्षात 146 टक्के लोडींगमध्ये वाढ झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. या उपक्रमांत मेसर्स महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, मेसर्स टाटा मोटर्स आणि मेसर्स मारुती उद्योग इत्यादी प्रमुख मोटार वाहन उद्योगांशी कार, पिक-अप व्हॅन, ट्रॅक्टर, जीप इत्यादीच्या वाहतुकी संदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या. मुंबई विभागातील कळंबोली, भुसावळ विभागातील नाशिक रोड, पुणे विभागातील चिंचवड स्टेशन, सोलापूर विभागातील बाळे स्टेशन व नागपूर विभागातील अजनी स्थानक येथे वाहनांच्या वाहतुकीसाठी लोडिंग सुविधा विकसीत करण्यात आल्या आहेत.
फेब्रुवारीत 32 रॅक लोडींग
फेब्रुवारी 2021 मध्ये रेल्वेने 32 रेक लोड केले आहेत तर गेल्या वर्षीच्या याच महिन्यात म्हणजेच फेब्रुवारी 2020 मध्ये 12 रेक लोड केले होते. म्हणजे फेब्रुवारी 2021 मध्ये 166 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत ऑटोमोबाईलच्या 246 रेकची लोडिंग झाली आहे तर गतवर्षीच्या याच कालावधीत म्हणजे एप्रिल 2019 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत 118 रेक लोड झाले. चालू वर्षाच्या लोडिंगमध्ये 146 टक्क्यांनी वाढ दिसून आली. गेल्या वर्षभरात ऑटोमोबाईलची वाहतूक देशाच्या विविध भागात केली गेली आणि बांगलादेशात निर्यातही केली गेली. रेल्वेच्या या उपक्रमामुळे मौल्यवान इंधनाच्या बचतीसह कार्बन फूटप्रिंटची बचत होते.




