महावितरणच्या अधिकार्याला खुर्चीत दोरीने बांधले : भाजपा आमदार मंगेश चव्हाणांची पोलिस कोठडीत रवानगी
जळगाव : जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकर्यांच्या शेतातील वीज जोडण्या तोडण्यात आल्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह संतप्त शेतकर्यांनी जळगाव येथील महावितरणच्या अधीक्षक कार्यालयावर शुक्रवारी धडक देत अधीक्षक अभियंता फारूख शेख यांना खुर्चीला दोरीने बांधून आंदोलन केल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी भा.ज.पा.आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह 31 शेतकर्यांना एम.आय.डी.सी. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले असता सर्वांना 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
आंदोलनाने राज्यात उडाली खळबळ
चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून शुक्रवारी वीज वितरणच्या जळगाव एम.आय.डी.सी.तील मुख्य कार्यालयात धडक दिली.








सहा हजार वीज जोडणी तोडल्याचा विचारला होता जवाब
आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकार्यांना जाब विचारला. यावेळी अनेक शेतकर्यांनी आपल्या समस्या यावेळी मांडल्या मात्र अधिकार्यांनी वरीष्ठांच्या आदेशानुसार आपण कारवाई करत असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे शेतकरी अधिक संतप्त झाले. चाळीसगाव तालुक्यात गेल्या आठ दिवसांत तब्बल सात हजार वीज कनेक्शन तोडण्यात आली आहेत. याबाबत जाब विचारला असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने आमदारांसह संतप्त शेतकर्यांनी अधीक्षक अभियंता शेख यांना दोरीने खुर्चीला बांधले व त्याच अवस्थेत केबिनमधून मुख्य कार्यालयाच्या आवारात आणले. वेळीच एम.आय.डी.सी. पोलिसांनी हस्तक्षेप करत अधीक्षक अभियंता शेख यांची सुटका केली होती.
आमदारांसह 31 जणांविरुद्ध गुन्हा
अभियंता फारुक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार चव्हाण यांच्यासह 40 ते 50 जणांवर भारतीय दंड विधान कलम 353, 332, 143, 147, 149, 351, 294, 269, 188, मुंबई पोलिस कायदा कलम 135 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अनुषंगाने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह 31 जणांना पोलिसांनी अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयाने 30 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.