रस्त्यावर विनाकारण भटकणार्यांवर आता प्रशासनाकडून अॅन्टीजन मात्रा
जिल्ह्यात रस्त्यावरील अॅन्टीजन टेस्टमध्ये पहिल्या दिवशी 22 बाधीत आढळले : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय : बाधीतांवर तातडीने उपचार
जळगाव : राज्यात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर 15 दिवस संचारबंदी जाहीर झाल्यानंतरही जिल्ह्यात मात्र रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांच्या प्रमाणात वाढ सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अशांविरुद्ध रस्त्यावर गुरुवारी अॅन्टीजन टेस्ट करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी या टेस्टमध्ये बाधीत आढळल्याने खळबळ उडाली. पहिल्या दिवशी गुरुवारी चोपडा, रावेर, एरंडोल, बोदवड या शहरात 22 जणांचा अहवाह पॉझीटीव्ह येताच विनाकारण बाहेर पडणार्यांची भंबेरी उडाली.
रावेरात आढळले चार बाधीत
रावेर : शहरातील डॉ.आंबेडकर चौकात अचानक रस्त्यात जाणारे येणारे लोकांची कोरोना अँटीजन टेस्ट रावेर नगरपालिका मुख्याधिकारी रवींद्र लांडे व वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी.महाजन, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यावेळी 90 नागरीकांच्या पाहणीत तब्बल चार पॉझीटीव्ह आढळले. संबंधिताना उपचारकमी कोव्हीड उपचार केंद्रात पोलिसांनी दाखल केले आहे. काही कारण नसताना विनाकारण भटकणार्यांवर अशाच पद्धत्तीने तपासणी करण्यात येणार आहे.

चोपड्यात एक बाधीत आढळला
चोपडा : शहर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजी चौकात विनाकारण रस्त्यावर फिरणार्या 75 व्यक्तींची तपासणी केल्यानंतर त्यात एक पॉझीटीव्ह आढळला. त्यास कोवीड सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
बोदवडमध्ये 12 बाधीत आढळले
बोदवड : 132 लोकांच्या चाचणीत तब्बल 12 बाधीत आढळले.
एरंडोलमध्ये नऊ बाधीत आढळले
एरंडोल : नगरपालिका पथकासोबत संयुक्त कारवाई दरम्यान विनाकारण फिरणार्या एकूण 158 नागरीकांची रॅपिड अँटी जन चाचणी करण्यात आली असता 9 पॉझीटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली.
नागरीकांना घरात थांबण्याचे आवाहन
प्रशासनाने विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन नागरीकांना करून सहकार्याचे आवाहन केले आहे. जिल्ह्यात अशाच पद्धत्तीने अन्य शहरातही अचानक बाहेर फिरणार्यांची अॅन्टीजन टेस्ट केली जाणार आहे.
