वरणगावात तरुणाचा खून : दोघा आरोपींना 11 जूनपर्यंत पोलिस कोठडी


वरणगाव : सहा महिन्यांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणावरून चौघांनी 25 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शहरातील डॉ.आंबेडकर नगराजवळील महालक्ष्मी सॉल मिलजवळ सोमवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडली होती. टोळक्याने केलेल्या हल्ल्यात सचिन जीवराम मगरे (25, आंबेडकर नगर, वरणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोघा आरोपींना अटक करण्यात आली. मंगळवारी आरोपींना भुसावळ न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची (11 जूनपर्यंत) पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

खुनाला जुन्या वादाची किनार
सहा महिन्यांपूर्वी भोला इंगळे यांच्या नातीच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सचिन मगरे हा नाचत असताना त्याचा अजय तायडे व अन्य दोघांशी वाद झाल्यानंतर त्यास मारहाण करून धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यावेळी संबंधितानी त्यास भोगावती नदीच्या घाण पाण्यात फेकून दिले होते मात्र त्यावेळी भीमराज मगरे यांनी माफी मागितल्याने वादावर पडदा पडला होता मात्र सोमवारी पुन्हा जुन्या वादातून खुनाची घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले.



धारदार शस्त्रांचे वार केल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
सोमवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास सचिन जीवराम मगरे (25, आंबेडकर नगर, वरणगाव) हा डॉ.आंबेडकर नगराजवळील महालक्ष्मी सॉल मिलजवळ जीमवरून दुचाकीने आला असता चौघा संशयीतांनी जुना वाद उकरून काढत आपल्याजवळील धारदार शस्त्राने सचिनच्या तोंडावर, मानेवर, पाठीवर सपासप वार केल्याने सचिनचा जागीच मृत्यू झाला. तत्पूर्वी भीमराज मगरे यांना घटना कळताच त्यांनी धाव घेत भावाला उपचारार्थ हलवले मात्र डॉक्टरांनी मयत घोषित केले. खुनाची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड, सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत शांतता निर्माण केली.

चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा : तिघांना अटक
खून प्रकरणी भीमराज जीवराज मगरे (27, डॉ.आंबेडकर नगर, वरणगाव) यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपी राहुल गजानन कदम (24), अक्षय संजय भैसे (23), अजय रवींद्र तायडे (21) व अन्य एकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुल, अक्षय यांना अटक करण्यात आल्यानंतर मंगळवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता 11 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, रात्री उशिरा अजय तायडे यासदेखील अटक करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. तपास सहा.निरीक्षक संदीपकुमार बोरसे करीत आहेत.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !