‘डॉक्टर डे’ च्या दिवशीच डॉक्टर दाम्पत्याची आत्महत्या
पुणे : राष्ट्रीय डॉक्टर्स डेच्या दिवशीच वानवडीतील डॉक्टर दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. निखिल शेंडकर आणि अंकिता शेंडकर असं आत्महत्या करणार्या डॉक्टर दाम्पत्याचं नाव आहे. डॉ.निखील आणि पत्नी अंकिता शेंडकर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतले असून दोघेही प्रॅक्टिसिंग डॉक्टर्स होते. बुधवारी सायंकाळी निखील घरी येत असतानाच त्याचे फोनवरुन पत्नीशी भांडण झाले व नंतर अखेर अंकिताने फोन ठेवून दिला. निखील घरी आल्यावर अंकिता दरवाजा उघडत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता पत्नीने पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळल्याने खळबळ उडाली. अंकिताने आत्महत्या केल्याने निखीलला मोठा मानसिक धक्का बसला. त्यानंतर त्यानेही ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. ही घटना गुरुवारी सकाळी वाजता उघडकीस आली. वानवडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.



