डॉ.हर्षल माने यांना पद दिल्यानेच आमदार चिमणराव पाटलांची आगपाखड : डॉ.सतीश पाटील
जळगाव : चिमणराव पाटील यांना त्यांच्या मुलाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख करायचे होते मात्र शिवसेना नेतृत्वाने ते पद डॉ.हर्षल माने यांना दिले. या शल्यातूनच आमदार चिमणराव पाटील यांनी अशी आगपाखड केली असावी, असा टोला माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना ते बोलत होते. आमदार चिमणराव पाटील यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर त्रास देत असल्याचा केलेला आरोप म्हणजे बालिशपणा आहे. त्यात तथ्य किंवा अर्थही नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पालकमंत्री सर्वच बाबतीत श्रेष्ठ
माजी पालकमंत्री सतीश पाटीली म्हणाले की, आमदार चिमणराव पाटील म्हणतात की, 2014 साली त्यांचा पराभव घडवला गेला. मात्र हा पराभव कसा व कुणी घडवला हे सांगायला ते तयार नाही. त्यामुळे त्यांच्या या बोलण्यातही अर्थ वाटत नाही. आमच्या मतदार संघात 2014 साली कुणी शिवसेनेचा बंडखोर नेता नव्हता. मग त्यांची मते कुणी खाल्ली हे तर सगळ्या जगाला माहिती आहे. चिमणराव पाटील कधी शिवसेनेत आले हेही सगळ्यांना माहिती आहे. चिमणराव पाटील यांच्यापेक्षा गुलाबराव पाटील सगळ्याच बाबतीत ज्येष्ठ आहेत. गुलाबराव पाटील चौथ्यांदा निवडून आले आहे. शिवसेना पक्ष संघटनेसाठी त्यांचे काम चिमणराव पाटलांपेक्षा मोठे आहे. डॉ. हर्षल माने गेल्या दहा वर्षांपासून शिवसेनेसाठी सक्रिय आहेत. शिवसेनेच्या जिल्हा प्रमुख पदावर आपल्या मुलाची निवड व्हावी म्हणून चिमणराव पाटील आठवडाभर मुंबईत होते. मात्र शेवटी त्या पक्षाच्या नेत्यांनी हर्षल पाटील यांची निवड केली. आपली हुकूमशाही चालावी हीच आमदार चिमणराव पाटलांची वृत्ती असल्याचा आरोपही माजी आमदार डॉ.सतीश पाटील यांनी केला.




