भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेला गवसला मुहूर्त
भुसावळ : भुसावळ पालिकेच्या सर्वसाधारण सभेला अखेर मुहूर्त गवसला असून आठ महिन्यांनी शुक्रवार, 16 रोजी सकाळी 11 वाजता ऑनलाइन पध्दतीने सभा होणार आहे. या सभेत 317 विषय अजेंड्यावर आहेत. या सभेतील विषयांना मंजूरी मिळाल्यानंतर शहरातील विकासात्मक कामे करण्यास वेग येणार आहे. पालिकेची सर्वसाधारण सभा 27 नोव्हेंबर 2020 रोजी झाली होती. या सभेनंतर आता आठ महिन्यांच्या कालावधीनंतर सभा होत आहे. प्रभारी नगराध्यक्ष प्रमोद नेमाडे हे पीठासीन अधिकारी असतील. तर मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांची उपस्थिती राहिल. ऑनलाइन सभेसाठीचे अजेंडा नगरसेवकांना वितरीत करण्यात आला आहे. या सभेत शहरातील अनेक विकासात्मक विषयांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे.




