पोलिसांची मोठी कामगिरी : यावल दरोड्यात वापरलेली दुचाकी जप्त


बंदुकीच्या धाकावर सराफा दुकानातून झाली होती साडेअकरा लाखांची लूट : संशयीतांचा कसून शोध

यावल : शहरात शस्त्रधारी चार तरुणांनी बंदुकीच्या धाकावर सराफा दुकानात भरदिवसा धाडसी दरोडा टाकल्याची घटना बुधवार, 7 रोजी घडली. दरोडेखोरांनी सराफाला बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवत तब्बल 216 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 55 हजाराची रोकड मिळून 11 लाख 26 हजार 675 रुपयांचा ऐवज घेवून पल्सर दुचाकीवरून पोबारा केला होता. पाच दिवसांपासून जळगाव गुन्हे शाखेसह यावल पोलिसांकडून दरोड्याचा कसून तपास सुरू असतानाच पोलिसांनी सोमवारी गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यात वापरलेली पल्सर दुचाकी तापी नदीच्या खोर्‍यातून जप्त केली आहे. पोलिसांना तपासाच्या दृष्टीने हा महत्वाचा क्लू मानला जात असून दुचाकीच्या आधारे दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न आता केला जात आहे.




दरोडेखोरांचा पोलिसांकडून कसून शोध
यावल शहरातील सराफा गल्लीतील बाजीराव काशीदास कवडीवाले यांच्या सराफा दुकानात दुकान मालक जगदीश कवडीवाले हे दुकानात एकटेच असताना बंदुकधारी चार तरुणांनी दुकानात शिरत कवडीवाले यांच्या डोक्याला पिस्तूल लावून बुधवार, 7 जुलै रोजी भरदिवसा लूट केली होती. लुटीनंतर चौघे दरोडेखोर काळ्या रंगाच्या पल्सरने पसार झाले होते. पाच दिवसांपासून पोलिसांकडून दरोड्याची उकल करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांना दुचाकीबाबत गोपनीय माहिती मिळाली. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही अंजाळे शिवारातील तापी नदीच्या खोर्‍यातून असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी सायंकाळी सात वाजता पोलिसांनी ती ताब्यात घेतली. या दुचाकीच्या आधारे पोलिसांचा दरोडेखोरांना पकडण्याचा मानस असून तीन संशयीतांची ओळख पटल्याचीदेखील माहिती आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !