माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसह राज्य सरकारला उच्च न्यायालयाचा दणका : याचिका फेटाळल्या


मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने दणका देत दाखल याचिका फेटाळल्या आहेत. सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी याचिका अनिल देशमुख यांनी केली तर अनिल देशमुख प्रकरणात दाखल गुन्ह्यातील दोन मुद्दे वगळावे या मागणीसाठी राज्य सरकारने याचिका दाखल केली मात्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्या. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रामधील दाव्यांच्या तपासानंतर अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. आपल्याविरोधात कोणतेही पुरावे तपास यंत्रणेकडे नाहीत. सीबीआयनं केवळ राजकिय सूडापोटी आपल्याविरोधात एफआयआर घेतली आहे, असं अनिल देशमुख यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे. या प्रकरणात महत्त्वाचा कायदेशीर प्रश्न गुंतलेला असल्याने निर्णयाला काही दिवसांसाठी स्थगिती द्यावी, अशी विनंती अनिल देशमुख यांच्यातर्फे करण्यात आली. मात्र, स्थगिती देण्यासाठी कोणतेही कारण नसल्याचं सांगत हायकोर्टाने देशमुख यांच्यातर्फे करण्यात आलेली विनंतीही फेटाळली. तर सचिन वाझेला पोलीस दलात घेण्यामागे आणि पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हस्तक्षेप होता, असं सीबीआयने त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे. हे दोन मुद्दे गुन्ह्यातून वगळावेत, यासाठी राज्य सरकारने याचिका केली होती. निकालावर दोन आठवडे स्थगिती देण्याची मागणी राज्य सरकारतर्फे करण्यात आली होती. मात्र हायकोर्टाने निकालास स्थगिती देण्यास नकार दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !