तळीये दुर्घटनेतील वाचलेल्या नागरीकांचे केंद्र व राज्य शासन पुर्नवसन करणार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी : तळीये गावाची केली पाहणी : पुष्पचक्र अर्पण करून मृतांना वाहिली श्रध्दांजली
रायगड : महाडमधील तळीये या गावी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मंगळवारी महाड तालुक्यातील तळीये या दरडग्रस्त गावाची पाहणी केली.राज्यपाल म्हणाले की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आहे. जे घडले आहे ते नीट करणे कठीण असले तरी सुदैवाने या दुर्घटनेतून वाचलेल्या नागरीकांचे केंद्र सरकार, राज्य सरकारमार्फत पुनर्वसन करण्याचे व त्यांना जास्तीत-जास्त सुविधा देण्याचा एकत्रीत प्रयत्न केंद्र व राज्य शासन करील. या ठिकाणी मृत झालेल्या व्यक्तींना मी मनापासून श्रध्दांजली अर्पण करीत असून ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. तुम्ही सर्वांनी सकारात्मकरित्या एकत्र येत काम केल्यास लवकरात-लवकर उपाय करण्यासाठी सहकार्य मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.
यांची होती उपस्थिती
यावेळी पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार भरत गोगावले, आमदार आशिष शेलार, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी महाड निलेश तांबे, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशीद, सुधागड तहसीलदार दिलीप रायण्णावर, तळा तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी, तळीये गावाचे सरपंच, दुर्घटनेतील मृत पावलेल्या ग्रामस्थांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.



