जुनी वाहने भंगारात काढण्यासाठीचे धोरण हा भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा -पंतप्रधान
नवी दिल्ली : वाहने भंगारात काढण्यासाठी आज सुरू करण्यात आलेले धोरण म्हणजे भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ‘वाहने भंगारात काढण्यासाठी आज सुरू करण्यात आलेले धोरण म्हणजे भारताच्या विकासाच्या वाटचालीतला महत्वाचा टप्पा आहे. वाहने भंगारात काढण्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी गुजरातमध्ये आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूकदार परीषदेमुळे संधीची नवी दालने खुली होणार आहेत. आपले युवा आणि स्टार्ट अप्स यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्याची मी विनंती करतो.’ असे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.
प्रदूषणात होणार घट
वाहने भंगारात काढण्यासंदर्भातल्या या धोरणामुळे रस्त्यावर धावण्यासाठी अयोग्य आणि प्रदूषणकारक वाहने, पर्यावरण स्नेही पद्धतीने टप्याटप्याने भंगारात काढण्यासाठी मदत होणार आहे. व्यवहार्य चक्राकार अर्थव्यवस्था निर्माण करणे आणि पर्यावरणाप्रती उत्तरदायीत्व निभावत सर्व संबधितांसाठी योग्य मूल्य आणणे हे आपले उद्दिष्ट असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.



