जागतिक कौशल्य स्पर्धेसाठीच्या पहिल्या चाचणीत रावेरच्या नितीन महाजनने मिळवले सर्वाधिक गुण
रावेरच्या महाजन आय.टी.आय.चा शिरपेचात रोवला मानाचा तुरा
रावेर : चीनमधील शांघाय येथे 2022 मध्ये ‘जागतिक कौशल्य स्पर्धा’ होत असून या स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या पहिल्याच पातळीत राज्यातून सर्वाधिक गुण मिळवण्याचा मान रावेरच्या महाजन आय.टी.आय.चा विद्यार्थी नितीन महाजन याने पटकावला असून रावेरच्या महाजन आयटीआयच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नितीनच्या नेत्रदीपक यशासाठी महाजन आय.टी.आयचे अध्यक्ष कैलास महाजन यांनी व संचालक कपिल पाटील यांनी त्यास शुभेच्छा दिल्या. नितीनला प्राचार्य ए.बी.तडवी आणि वीज तंत्री निदेशक आर.महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.
रावेर शहरासाठी अभिमानाची बाब
जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी महाजन आय.टी.आय.चया विद्यार्थ्याने राज्यातून सर्वाधिक गुण मिळवून जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर त्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रावेरकरांसाठी ही भूषणावह बाब असून यासाठी महाजन आय.टी.आय.च्या शिक्षकांनी मेहनत घेतली असून अशा स्पर्धांमुळे रावेरातील मुले भविष्यात चमकू शकतात, असे उपनगराध्यक्ष अॅड.सुरज चौधरी म्हणाले.



तरुणांनी कौशल्य युक्त शिक्षणाकडे वळायला हवे
योग्य संधी लक्षात घेऊन हे स्वप्न साध्य करण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी नेहमीच असावी. यासाठी स्वतःला झोकून देता आला पाहिजे. फक्त ज्ञान असून चालत नाही तर त्याच सोबत मेहनत घेण्याचीही तयारी असावी लागते. प्रत्येकालाच यशस्वी व्हायचे असते पण त्यासाठी घ्यावी लागणारी प्रचंड मेहनत मात्र अनेकांना नको असते. यशस्वी होण्यासाठी स्वप्न, संधी आणि साध्य हे तीन शब्द अतिशय महत्त्वाचे असतात. विद्यार्थ्याने ध्येयवेडं असणे अतिशय गरजेचं आहे. कौशल्य स्पर्धा परीक्षांमध्ये उतरणारे सर्वच विद्यार्थी हुशार असतात. पण या स्पर्धेत टिकून रहायचं असेल तर कौशल्य असणं गरजेचं आहे, असे रावेर माळी समाजाचे अध्यक्ष गोटू शेट म्हणाले.

