भारतीय संस्कृती घडवते खर्‍या माणसाचे दर्शन : प्रा.मनोहर आंधळे

पु.ओं.नाहाटा महाविद्यालयात वाड्मय मंडळ व वाद-विवाद मंडळाचे उत्साहात उद्घाटन


भुसावळ (सोमवार, 24 ऑगस्ट 2026) : भुसावळ कला, विज्ञान आणि पु. ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाड्मय मंडळ व वाद-विवाद मंडळाच्या वतीने ‘मानवाच्या वर्तनातून आपल्या संस्कृतीचे दर्शन’ या विषयावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे होते.

यांची होती उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.मनोहर आंधळे, उपप्राचार्य डॉ.जी.आर.वाणी, इंग्रजी विभागप्रमुख डॉ.स्मिता चौधरी, डॉ.अनिल हिवाळे, प्रा.वंदना महाजन आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ.अनिल हिवाळे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.स्मिता चौधरी यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. वंदना महाजन यांनी केले.




डॉ. मनोहर आंधळे म्हणाले की, भारतीय संस्कृती ही त्याग, शील, संस्कार, संयम आणि सदाचार या मूल्यांवर आधारित आहे. मानवाच्या वर्तनातूनच त्याच्या संस्कृतीचे खरे दर्शन घडते. भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिले. त्यांच्या त्यागातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे त्यांनी सांगितले. आजच्या काळात मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण पिढीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असून त्यांच्या बौद्धिक विकासावर परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांनी केकी मूस यांच्यासह विविध व्यक्तींचे दाखले देत विद्यार्थ्यांना संस्कारक्षम जीवन जगण्याचा संदेश दिला. वि. दा. करंदीकर व साने गुरुजी यांच्या साहित्य-कवितांमधून सामाजिक मूल्यांची जोपासना आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते, असेही त्यांनी नमूद केले.

आईकडून संस्कार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आदर्श जीवन घडविले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, साने गुरुजी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारताचे दीपस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या संस्कृतीची जाण ठेवून देशाचे नाव लौकिक करावे. जीवन अत्यंत सुंदर आहे; सर्वांनी आनंदाने जगा आणि जगण्यावर प्रेम करा, असा संदेश प्रा. आंधळे यांनी दिला.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. बी. एच. बर्‍हाटे म्हणाले, आपली संस्कृती दिव्य आणि समृद्ध आहे. विविधतेतून एकतेचा संदेश देणे हे भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील चांगल्या मूल्यांचे आचरण करून समाजाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी डॉ. मनोज पाटील यांनी आभार मानले. यावेळी डॉ.पी.ए.अहिरे, डॉ.प्रफुल्ल इंगोले, प्रा.गौतम भालेराव, डॉ.सचिन राजपूत, डॉ.राजेंद्र तायडे, प्रा.भूपेंद्र बाणाईत, प्रा.रुपेश धुंदाळे, प्रा.रितेश खडके, प्रा.मनोहर गायकवाड, प्रा.श्रीपाद वाणी, प्रा.कौस्तुभ पाटील, प्रा.कुणाल तायडे, डॉ.प्रियंका महाजन, प्रा.डॉ.किरण समर्थ, प्रा. कविता पांडव, प्रा.शलाका निकम, प्रा.योगीता भंगाळे आदी उपस्थित होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !