भुसावळ पालिकेचे लेखा परीक्षण चार वर्षांपासून रखडले
माहिती अधिकारातून बाब उघड : त्रृटींची पुर्तता न केल्याने विलंब
भुसावळ : नाशिक विभागातील सर्वांत मोठी ‘अ’ वर्ग नगरपालिकेचे गेल्या चार आर्थिक वर्षांचे लेखापरीक्षणच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नी.तू.पाटील यांनी माहिती अधिकारातून याबाबत पालिकेला विचारणा केली होती. यातून ही माहिती समोर आली. तसेच दोन वर्षांच्या लेखा परीक्षणाच्या त्रृटींची पूर्तता करण्यास विलंब झाल्याने ही प्रक्रिया रखडल्याचे प्राथमिकही निदर्शनास आली आहे.
माहिती अधिकारातून बाब उघड
पालिका प्रशासनाने सहाय्यक संचालक स्थानिक निधी लेखा परीक्षा, जळगाव यांना लेखा परिक्षणाबाबत कळवले होते. यानुसार त्यांनी पालिकेला 4 जानेवारी रोजी सन 2016 – 17 व 2018 -19 या आर्थिक वर्षाच्या लेखापरिक्षासाठी अभिलेख मागणी केली होती. तसा अहवाल सादर करण्याचे सूचित केले होते. यानंतरच सन 2016 – 17 ते 2019 – 2020 या वर्षांचे लेखापरिक्षणाचे नियोजन करता येईल, असेही नमुद केले होते. अर्थात पालिकेचे चार वर्ष उलटूनही लेखा परिक्षण झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. यामुळे सन 2016 ते 2020 दरम्यानचे लेखापरिक्षणाची प्रक्रिया अद्यापही सुरु आहे. भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांनी माहिती अधिकारातून याबाबत पालिकेला विचारणा केली होती. यातून ही माहिती समोर आली. भुसावळ नगरपालिका ही नाशिक विभागातील अ वर्ग तसेच मोठी नगरपालिका आहे. यामुळे नगरपालिकेचे लेखा परीक्षण वेळेत होणे अपेक्षीत आहे, मात्र अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या निमित्ताने प्रशासनाची कासगवतीही समोर आली आहे. या प्रकरणी आता तक्रार करणार असून लेखा परीक्षण करावे, अशी मागणी डॉ.पाटील यांनी केली आहे.




