जळगाव जिल्ह्यातील उडीदासह मूग पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
खासदार उन्मेश पाटील यांची जळगाव जिल्हाधिकार्यांकडे मागणी
जळगाव : यंदाच्या खरीप हंगामात जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने व पावसाचा मोठा खंड पडल्याने 70 टक्के उडीद, मुगाचे पिकाची मर झालेली असून, शेतकर्यांच्या हाताशी पिक येण्याची शक्यता धूसर होत आहे. 17 ऑगस्ट 2021 नंतर झालेल्या सततच्या पावसाने, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेले पिकाला देखील कोंब फुटलेले आहेत यामुळे उडीद व मुगाचे थोडेफार येणारे उत्पादन देखील पूर्णपणे वाया गेलेले आहे. खरीप हंगामात उडीद मूग उत्पादक शेतकर्यांना कुठलेही उत्पादन हाती न आल्याने शेतकर्यांना सूर्यफुल इ. पिकाची लागवड व रब्बी हंगाम पूर्व शेती मशागत करण्यासाठी तयारीस लागलेले असून वरील पिकांचे पंचनामे तात्काळ होणे अतिशय गरजेचे असून पंचनामे करण्याचे तातडीने आदेशीत करावे अशी मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी जिल्हाधिकारी यांचे कडे केली आहे.
जिल्हाधिकार्यांना दिले पत्र
आपल्या पत्रात खासदार उन्मेश पाटील यांनी नमूद केले आहे की, जिल्ह्यातील प्रमुख कडधान्य पीक उडीद व मूग आहेत. सदरील कडधान्य पिकाचा खरीप 2021ची पेरणी क्षेत्राची माहिती घेतली असता जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाचे 20911 हेक्टर व मूग पिकाचे 22924 हेक्टर लागवड केलेले क्षेत्र आहे. एकट्या जळगाव लोकसभा मतदार संघातील बहुतांश बागायत व कोरडवाहू शेतकरी खरीप हंगामात उडीद व मूगाची पेरणी करत असतात. यावर्षी जळगाव जिल्ह्यात शासनाने दिलेल्या आकडेवारी अनुषंगाने सदरील पिक परिस्थितीत उडीद व मूगाचे पिक पूर्णपणे वाया गेलेले असून शेतकर्यांना यापासून कुठल्याही प्रकारचे उत्पन्न मिळणार नाही असे प्रत्यक्ष पाहणी वेळी लक्षात आले आहे.



70 टक्के पिकांचे नुकसान
या वर्षी खरीप हंगामात जुलै महिन्यात कमी पाऊस झाल्याने व पावसाचा मोठा खंड पडल्याने 70 टक्के उडीद, मुगाचे पिकाची मर झालेली असून, शेतकर्यांच्या हाताशी पिक येण्याची शक्यता धूसर होत आहे. दि. 17 ऑगस्ट 2021 नंतर झालेल्या सततच्या पावसाने, दाणे भरण्याच्या अवस्थेत असलेले पिकाला देखील कोंब फुटलेले आहेत यामुळे उडीद व मुगाचे थोडेफार येणारे उत्पादन देखील पूर्णपणे वाया गेलेले आहे.
खरीप हंगामात उडीद मूग उत्पादक शेतकर्यांना कुठलेही उत्पादन हाती न आल्याने शेतकर्यांना सूर्यफुल इ. पिकाची लागवड व रब्बी हंगाम पूर्व शेती मशागत करण्यासाठी तयारीस लागलेले असून वरील पिकांचे पंचनामे तात्काळ होणे अतिशय गरजेचे आहे. आपण तातडीने महसूल व कृषी विभागाचे यंत्रणेमार्फत प्रत्येक शेतकर्यांचे पंचनामे करून झालेल्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर करावा जेणेकरून शेतकर्यांना कुठेतरी आर्थिक मदत मिळण्यास पाठपुरावा करणे सोयीचे होईल. अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.
शेतकर्यांना ई पीक पाहणी अॅपमधील पीक पेर्याची सक्ती नको
ई-पीक पाहणी अॅपबाबत कुठेही शेतकर्यांना सक्ती करण्यात येऊ नये कारण की बहुतांश शेतकर्यांना ई पीक पाहणी अॅपबाबत परिपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मी आशा बाळगतो की, आपण तात्काळ सदरील विषयात लक्ष घालून योग्य ती कारवाई कराल, असा आशावादही पत्रान्वये व्यक्त करण्यात आला आहे.

