भुसावळातील भोळे महाविद्यालयाचे प्रा.डॉ.संजय चौधरी यांना जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार


भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.डॉ.संजय चौधरी यांना गोदावरी फौंडेशन जळगाव व हॉकी असोसिएशन, जळगाव यांच्यामार्फत जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार 2021 नुकताच गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रदान करण्यात आला.

27 वर्षांपासून खेळाडूंना मार्गदर्शन
प्रा.डॉ.संजय चौधरी हे 27 वर्षांपासून क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना मार्गदर्शन करीत असून त्यांनी विविध खेळांमध्ये आंतर महाविद्यालय, आंतर विभाग, विद्यापीठ स्तर, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे तसेच आयोजन समिती सदस्य, तांत्रिक समिती सदस्य, पंच, निवड समिती सदस्य म्हणून राज्य ते आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य केले आहे. आशियाई सॉफ्टबॉल स्पर्धा चेन्नई 1996, औरंगाबाद 2000, व वाशी, नवी मुंबई 2010 मध्ये पंच, व आयोजन समिती सदस्य म्हणून कार्य केले आहे. प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी 2003, 2008 ते 2010 मध्ये जळगाव विद्यापीठ क्रीडा मंडळावर कार्य केले आहे. विद्यापीठात शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयाचे एम.फिल व पी.एचडी संशोधन मार्गदर्शक म्हणून कार्य करीत आहेत. त्यांनी स्वतः सॉफ्टबॉल, बॅडमिंटन, बॉल बॅडमिंटन, फेन्सिंग, क्रिकेट, फुटबॉल इ. आंतर महाविद्यालय ते राष्ट्रीय पातळी पर्यंत खेळाडू म्हणून सहभाग घेतला आहे.




मार्गदर्शक व पदाधिकारी म्हणून कार्य
प्रा.चौधरी हे दीपनगर येथील संगम क्रिकेट क्लबचे संस्थापक सदस्य आहेत तसेच सॉफ्टबाल, आट्या-पाट्या, फेन्सिंग, बॉल बॅडमिंटन, हॉकी, हँडबॉल, ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेट, बॉक्सिंग क्लब इ. खेळाच्या संघटनांमध्ये मार्गदर्शक व पदाधिकारी म्हणून कार्य करीत आहे. या कार्याची दखल घेऊन गोदावरी फौंडेशन जळगाव व हॉकी असोसिएशन, जळगाव यांनी राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने रविवार, 29 ऑगस्ट 2021 रोजी ‘जिल्हा गुणवंत मार्गदर्शक पुरस्कार 2021’ माजी आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, डॉ.केतकी पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, जळगावच्या कबचौउमवि क्रीडा संचालक प्रा.डॉ.दिनेश पाटील, विष्णू भंगाळे, प्राचार्य व्ही.एस.पाटील, प्रा.आसीफ खान यांची उपस्थिती होती. दरम्यान, पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राचार्य डॉ.आर.पी.फालक, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी खेळाडू, मित्र परीवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !