रावेरात हिंस्त्र प्राण्याचा धुमाकूळ : वन विभागाचे दुर्लक्ष
गेल्या 20 दिवसात 40 शेळ्या केल्या फस्त ; नागरीकांमध्ये पसरली भीती
रावेर : रावेर शहरासह परीसरात हिंस्त्र प्राण्याचा प्रचंड धुमाकूळ वाढला असून याकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. प्राथमिक माहितीनुसार गत 20 दिवसात सुमारे 40 पाळीव शेळ्या या हिंस्त्र प्राण्याने फस्त केल्या आहे. यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी मध्यरात्री हिंस्त्र प्राण्याने उटखेडा रोड, मदिना कॉलनी, खाटीक वाडा भागातील निसार खान व लखन शेट यांची एक, सईद मन्यार यांच्या तीन तर शकील अहमद चार यांच्या पाळीव शेळ्या फस्त केल्या. हिंस्त्र प्राण्याचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतुन होत आहे.
वनपालांची घटनास्थळी धाव ; ट्रॅप कॅमेरे लावले
घटनेची माहिती मिळताच वनपाल अतुल तायडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पगमार्ग शोध घेतला असता हल्ला करणारा हिंस्त्र प्राणी कोल्हा असल्याची प्राथमिक माहिती आहे तसेच या प्राण्याचा शोध घेण्यासाठी वेग- वेगळ्या वेगवेगळ्या स्थळी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले.



मागील काही दिवसात 40 शेळ्या केल्या फस्त
रावेरमध्ये या हिंस्त्र प्राण्याने मागील काही दिवसात वेग-वेगळ्या भागात सुमारे 40 पाळीव शेळ्या फस्त केल्या आहेत तसेच काही प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार सिंदखेडा, मुंजलवाडी, रसलपूर भागात सुध्दा अशाच पाळीव शेळ्या ठार केल्या. या हिंस्त्र प्राण्याचा धुमाकुळ प्रचंड वाढल्याने वनविभागाने ट्रॅप कॅमेरे लावले असून हल्ला करणारा प्राणी अद्याप वनविभागाला गवसलेला नाही.


