भुसावळात बाप्पांनी घालवली कोरोनाची भीती


भुसावळ शहरात 110 तर तालुक्यात 32 मंडळांतर्फे श्रींची स्थापना : सजावटीचे काम पूर्णत्वाकडे

भुसावळ : विघ्नहर्त्या लाडक्या गणरायाचे शुक्रवारी आगमन होत असल्याने पूर्वसंध्येला शहराचा बाजार गजबजल्याचे दिसून आले. श्रींच्या आगमनामुळे बाजारपेठेत नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने यंदा श्रींच्या उत्सवासाठी तरुणाई सरसावली आहे. भुसावळ शहरात 110 तर तालुक्यात 32 मंडळांतर्फे श्रींची स्थापना केली जात आहे. गुरूवारी विघ्नहर्ता गणेशाच्या स्वागताच्या तयारीसाठी हार-फुले, पूजा, फळे, पूजा साहित्य, मिठाई-मोदक, सजावटीचे साहित्य, मूर्ती खरेदीसाठी भाविकांनी शहरातील बाजारपेठेत मोर्दी गर्दी केली होती.

ग्राहकांच्या खरेदीने बाजारपेठेत नवचैतन्य
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बाजारपेठेतील उलाढाल थांबली होती यंदा मात्र दुसरी लाट ओसरल्याने नागरीकांमध्ये उत्साह संचारला आहे. शुक्रवारी जल्लोषात आगमन होत असून पूर्वसंध्येला गुरूवारी शहराचा बाजार ग्राहकांच्या गर्दीने फुलल्याचे दिसून आले. ग्राहकांनी गणेशाची मूर्ती, हार-फुले, दुर्वा, मिठाई-मोदक, विद्युत रोषणाई, आरास, सजावटीचे सामान आदींसह पूजा साहित्य खरेदी केले. शहरातील मुख्य बाजारपेठ असलेला नृसिंह मंदिर रोड, अप्सरा चौक, मरीमाता मंदिर परिसर, गांधी चौक ते मॉडर्न रोड व उत्तर भागातील लोखंडी बोगदा ते महाराणा प्रताप चौकापर्यंत तापी रोडवर गर्दी होती. लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी कोरोनाची भीती बाजूला सारत भाविक खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल झाले होते.




मंडळांची तयारीही पूर्णात्वाकडे
यंदा कोरोनाचे संकट असल्याने सार्वजनिक मंडळांनाही गणेशोत्सवात अनेक नियमावलींचे पालन करावे लागणार आहे. यंदा गणेश मंडळांनी ऑनलाइन दर्शन, सामाजिक उपक्रम, गरीबांना मदत, स्वॅब तपासणी शिबिर आदींचे नियोजन केले आहे. शहरातील प्रमुख मंडळांनी याबाबतच्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. शहरातील प्रमुख बहुतांश सर्वच मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी पूर्ण केली आहे.

भुसावळ तालुक्यात 142 मंडळांतर्फे श्रींची स्थापना
सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळ शहर हद्दीतील 50, बाजारपेठ हद्दीत 60 तर भुसावळ तालुका हद्दीत 32 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे श्रींची स्थापना केली जात आहे. कोरोना दुसरी लाट संपल्यामुळे भाविकांमध्ये श्रींच्या उत्सवासाठी मोठा उत्साह वाढला आहे. गणेश मंडळातर्फे गुरुवारी रात्री उशिरापर्यंत सजावटीच्या कामावर भर देण्यात आला होता तर बहुतांश ठिकाणी तयारी अंतीम टप्प्यात पोहोचली आहे. उत्सवासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !