रेल्वे वॅगन देताना एजंट दलाली थांबवा


खासदार रक्षा खडसेंच्या उपस्थितीत सावदा केला युनियनची डीआरएम प्रशासनाकडे मागणी

भुसावळ : केळी निर्यातीसाठी शेतकर्‍यांना रेल्वे प्रशासनाकडून रॅक (वॅगन) उपलब्ध होताना या प्रक्रियेत एजंटांचा (दलाल) हस्तक्षेप वाढला असून तो थांबवण्याची मागणी खासदार रक्षा खडसे यांच्यासह शेतकर्‍यांच्या शिष्टमंडळाने डीआरएम एस.एस.केडीया यांच्याकडे मंगळवारी केली. रावेर मतदारसंघातील विविध प्रश्‍नासंदर्भात खासदार खडसे यांनी डीआरएम प्रशासनाशी चर्चा केली. रावेर तालुक्यातील अनेक रेल्वे पुलाखालील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने शेतकर्‍यांना शेतात जाताना तसेच शेतीमाल आणताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने ही कामे करावीत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

वॅगन देताना एजंटांची दलाली वाढली
सावदासह रावेर येथे रेल्वे प्रशासनाकडून केळी निर्यातीसाठी रेल्वे प्रशासनाकडून भाडे तत्वावर वॅगन उपलब्ध करून दिले जाते मात्र या प्रक्रियेत एजंटांचा (दलाल) धुमाकूळ वाढला आहे. सहा हजार रुपये भाडे असताना शेतकर्‍यांकडून दहा हजार रुपये भाडे वसुल केले जात असून या प्रकारात केळी उत्पादकांची लूट होत असल्याने हा प्रकार थांबवावा, अशी मागणी खासदारांच्या उपस्थितीत आलेल्या शिष्टमंडळाने डीआरएम प्रशासनाकडे केली. या प्रकाराला काही रेल्वे प्रशासनातील काही अधिकार्‍यांचे खतपाणी असल्यास त्याबाबतही चौकशी करावी, अशी अपेक्षाही प्रसंगी व्यक्त करण्यात आली.




व्हीपीयु रॅकचीही मागणी
केळी उत्पादकांची मागणी लक्षात घेता वाढीव दोन व्हीपीयु रॅक उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. रावेर तालुक्यातील रेल्वे पुलांखाली रस्त्यांची दुरवस्था झाल्याने शेतकर्‍यांना शेतात जाताना व शेतातून शेत माल आणताना अडचणींचा सामना करावा लागत आहे शिवाय पावसामुळे पुलांखाली रस्त्यांची दुरवस्था झाल्याने त्या संदर्भात रेल्वे प्रशासनाने दखल घेवून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा प्रसंगी व्यक्त करण्यात आली.

यांच्या उपस्थितीत प्रशासनाशी चर्चा
यावेळी खासदार रक्षा खडसे, जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन, पंचायत समिती सदस्य जितू पाटील, सावदा केला युनियनचे अध्यक्ष डी.के.महाजन, रावेर भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुनील पाटील, रावेर पंचायती समितीचे माजी सभापती जितेंद्र पाटील, माजी उपसभापती महेश पाटील, मुक्ताईनगर भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अंकुश चौधरी व केळी उत्पादक युनियनचे सदस्य उपस्थित होते. मागण्यांबाबत दखल घेण्याचे आश्‍वासन डीआरएम केडीया यांनी यावेळी दिले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !