आठवड्यात एक तास शाळा : फी मात्र 15 हजार, युवा सेनेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार
भुसावळ : शहरातील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम शाळेतर्फे शालेय फीसाठी पालकांना सक्ती करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नाही म्हणून अनेक पालकांनी युवा सेनेकडे गार्हाणे मांडले होते. भुसावळ युवा सेनेतर्फे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांची भेट देऊन या शाळेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. सर्व पालकांनी, युवा सेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता पंचायत समिती, भुसावळ येथे उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. कोरोना साथीपायी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील सर्व शाळा बंद होत्या. मागील वर्षी ज्युनियर केजी, सिनियर केजी, पहिलीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून सोमवारी संध्याकाळी अर्धा तास आणि गुरुवारी संध्याकाळी अर्धा तास ऑनलाईन शिक्षण दिले होते. म्हणजे आठवड्यातुन एक तास शिक्षण दिले असतांना फी मात्र पूर्ण 15 हजार रुपये भरावी यासाठी सक्ती डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम शाळेच्या शिक्षकांनी केली आहे. यावर्षी सुद्धा या तिन्हीही वर्गाचे 70 मिनिटांचेच शिक्षण सुरू आहे. शाळा प्रत्यक्ष वर्गांसाठी घेते तितकी फी ऑनलाईन वर्गांसाठी आकारली जाऊ नये. लॉकडाऊनमुळे पालकांना आर्थिक तसेच मानसिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, असे युवासेना जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे लेखी तक्रारीत नमूद केले आहे.





