चार हजारांची लाच घेताना तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
नाशिक : सातबारा उतार्यावर तक्रारदाराच्या वडिलांसह काकांचे नाव लावण्यासाठी चार हजारांची लाच मागणार्या नगर जिल्ह्यातील तलाठीसह कोतवालास लाच स्वीकारताच नाशिक एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली. संगमनेर तहसील अंतर्गतच्या निमगाव जाळीतील तलाठी स्वाती बबनराव झुराळे (31) व निमगाव जाळीचे कोतवाल संदीप लक्ष्मण तांबे ( 31) अशी अटकेतील आरोपींचे नावे आहेत.
लाच स्वीकारताच अटक
निमगाव जाळी, (गोरक्षवाडी),ता.संगमनेर, जि.अहमदनगर येथील 25 तक्रारदाराने याबाबत एसीबीकडे तक्रार नोंदवली होती. दोघा संशयीत आरोपींनी तक्रारदाराच्या वडिलांसह काकांचे सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी 13 सप्टेंबर रोजी चार हजारांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर शुक्रवारी सापळा रचण्यात आला. आरोपींनी निमगाव जाळी तलाठी कार्यालयात लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.



यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अपर अधीक्षक निलेश सोनवणे, पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे (वाचक) यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक एसीबीचे पोलीस निरीक्षक जयंत शिरसाठ, निरीक्षक मीरा अदमाने, नाईक नितीन कराड, नाईक प्रभाकर गवळी, नाईक प्रवीण महाजन, हवालदार संतोष गांगुर्डे आदींच्या पथकाने यशस्वी केला.


