रावेरात श्री विसर्जनासाठी प्रशासन सज्ज : आठ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र
रावेर : श्री विसर्जनासाठी नगरपालिका प्रशासनातर्फे पूर्वतयारी करण्यात आली आहे. यंदा वाद्यासह मिरवणूक काढण्यास बंदी असून कोरोनाचा प्रभाव टाळण्यासाठी पालिकेतर्फे शहरात 8 ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र कार्यरत करण्यात आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने गणेशोत्वासाठी नागरीकांना निर्बंध घालून दिलेले आहेत. त्यानुसार विसर्जन मिरवणुकीवरही बंदी घालण्यात आलेली आहे तर गणेश मूर्तीच्या विसर्जनस्थळी होणारी गर्दी टाळण्यासाठी नगर पालिकेतर्फे उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यासाठी शहरात ठिकठिकाणी पालिकेतर्फे 8 मूर्ती संकलन केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. रविवार, 19 सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जनाच्या दिवशी या केंद्रांवर मूर्ती संकलित करण्यात येतील.
या ठिकाणी श्री मूर्तींचे संकलन
मराठा मंगल कार्यालय, अग्रसेन भवन, साई मंदिर (अष्टविनायक नगर), महादेव मंदिर (संभाजी नगर), स्वामी समर्थ केंद्र (विद्या नगर), श्री संत तुकाराम महाराज मंदिर (शिवाजी चौक), मारुती मंदिर (स्वामी विवेकानंद चौक), फायर स्टेशन (आठवडे बाजार) येथे संकलन केंद्रे कार्यान्वी करण्यात आली आहेत. अंबिका व्यायाम शाळा, श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा व रावेर युवा शक्ती विकास फाउंडेशनतर्फे तीन फिरती संकलन केंद्र कार्यान्वीत करण्यात येतील.



वाहतुकीसाठी विसर्जन रथ
मूर्ती विसर्जनस्थळी नेण्यासाठी सजविलेले चार विसर्जन रथ तयार ठेवण्यात आले आहेत. हे रथ सर्व केंद्रांवरून रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मूर्तीचे संकलन करतील. श्री विसर्जन योग्यरीत्या पार पडण्यासाठी दोन नियंत्रण अधिकारी, 16 संकलन केंद्र अधिकारी व कर्मचारी तसेच विसर्जन रथासोबत 19 कर्मचार्यांची पालिकेने नियुक्ती केली आहे.
संकलन केंद्रावर मूर्ती देण्याचे आवाहन
नागरीकांनी त्यांच्या घरातील मूर्ती तसेच खाजगी व सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश मूर्ती विसर्जनासाठी संकलन केंद्रावर जमा कराव्यात.विनाकारण कोणीही विसर्जन मिरवणूक काढू नये, असे आवाहन रावेरचे प्रभारी मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी केले आहे.


