ट्रॅक्टर पकडल्यानंतर चालक दाखवतात मध्यप्रदेशातील परवाना : महसूलचे लाखोंचे नुकसान


रावेर : महसूल प्रशासनाची कारवाई टाळण्यासाठी वाळू वाहतूकदारांनी एक नवीन शक्कल लढवली असून मध्यप्रदेश शासनाचा वाळू वाहतुकीची परवाना आणल्याने शासनाचा लाखोंचा महसूल बुडत आहे. रावेर तहसीलच्या आवारात सध्या वाळू अर्थकारण चर्चेचा विषय ठरला आहे. अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल पथकाने पकडल्यास मध्यप्रदेश शासनाच्या पावत्या दाखवल्या जात आहेत त्यामुळे दंडात्मक कारवाई टळत असलीतरी शासनाचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. महसूलच्या एका अधिकार्‍याने नाव न छापण्याच्या अटीवर अवैध वाळूच्या अर्थकारणाचा भांडाफोड केला आहे.

एमपीचा परवाना दाखवून सोडले जाते ट्रॅक्टर
महसूल पथकाने अवैध वाळुचे ट्रॅक्टर पकडल्यास स्पॉटवर पंचनामा केला जातो. त्यामध्ये ट्रॅक्टर नंबर, पकडलेल्या टीमचे नाव वेळ व तारीख असते व ट्रॅक्टर तहसीलमध्ये जप्त होते मात्र नंतर अवैध वाळू वाहतूकदार ताबडतोब मध्यप्रदेशात जावून तेथील अवैध वाळू वाहतुकीचा परवाना आणतात व जप्त केलेल्या वाळूच्या टॅ्रक्टरचा पंचनामा बदलवुन मध्य प्रदेशातून आणलेल्या पावतीच्या आधारे जप्त ट्रॅक्टर सोडवून घेतात, असा प्रकार सुरू असल्याने जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत. यात मोठे अर्थकारण सुध्दा केले जात असल्याचा आरोप आहे. यात महसूल विभागाचे अतोनात नुकसान होत असून याकडे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी जातीने लक्ष घालावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




महसूल विभागाला असा लागतो चुना
रावेर महसूल हद्दीतील तापी व भोकर नदीतून अथवा खिरवडच्या बर्डीमधून रावेर परीसरात अवैध वाळूची वाहतूक सुरू आहे. एखाद्या वेळेस रावेर महसूलच्या पथकाने अवैध वाळूचे ट्रॅक्टर पकडल्यास ट्रॅक्टर मालक मध्य प्रदेशच्या नाचखेडा पानथा (बर्‍हाणपूर) येथून वाळू वाहतूक करीत असल्याची पावती आणली जाते व केलेला पंचनामा बदलून पकडलेले ट्रॅक्टर दंड न घेता सोडून दिले जाते. या प्रकारामुळे महसूल विभागाला आपल्याच झारीच्या शुक्रााचार्यांमुळे लाखोचा चुना लावला जात असल्याचा आरोप होत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !