नशिराबादमधील खून प्रकरणी अटकेतील दोघा आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
भुसावळातील मयत तरुणावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : भुसावळातील गुन्हेगारीचे उच्चाटण काळाची गरज
भुसावळ : नशिराबाद येथे भर दिवसा झालेल्या भुसावळातील तरुणाच्या हत्येनंतर भुसावळातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. सुमारे 11 महिन्यांपूर्वी भुसावळातील 17 वर्षीय तरुणाची हत्या झाल्यानंतर त्या खुनाचा बदला घेण्यासाठीच मंगळवारी भर दिवसा नशिराबादमध्ये 20 वर्षीय धम्मप्रिय उर्फ धम्मा मनोहर सुरळकर (20, पंचशील नगर, भुसावळ) या तरुणाचा कारागृहातून बाहेरच पडताच निघर्र्ृण खून करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. दरम्यान, बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात व पोलीस बंदोबस्तात मयत धम्मप्रिय सुरळकर या तरुणावर तापी काठावरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
मयत धम्मप्रिय सुरळकर या तरुणावर बुधवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात शोककुल वातावरणात तापी नदी काठावरील स्मशानभूमतीत अंत्यसंस्कार करण्यात आला. तत्पूर्वी बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह पंचशील नगरातील घरी आणताच कुटुंबाने टाहो फोडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत तसेच दंगा नियंत्रण पथकासह बाजारपेठ पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मयत तरुण धम्मप्रियच्या पश्चात आई, वडील, दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे.



दोघा आरोपींना पाच दिवसांची कोठडी
धम्मप्रिय सुरळकर (20) या तरुणाच्या खून प्रकरणी नशिराबाद पोलिसांनी अटक केलेल्या संशयीत आरोपी शेख समीर (20) व चुलत भाऊ शेख रेहान शेख नईम (22) यांना बुधवारी जळगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची (27 सप्टेंबरपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस कोठडीत आरोपींना कट्टा व चाकू कोठून आणला शिवाय या गुन्ह्यात अन्य कुणाचा सहभाग आहे वा नाही? याची माहिती कळणार आहे. तपास पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे करीत आहेत.
भुसावळातील गुन्हेगारीचा बीमोड गरजेचा
भुसावळात क्षुल्लक-क्षुल्लक गोष्टीवरून शहरात खून झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक वाटेल, अशी कृती यापुढे पोलिसांकडून सर्वसामान्य जनतेला अपेक्षित आहे. तासाभराच्या अंतरावर असलेल्या मध्यप्रदेशात सहज गावठी कट्टा उपलब्ध होत असल्याने तरुणांमध्ये गावठी कट्ट्याची क्रेझ वाढली आहे. विशिष्ट नेटवर्क त्यासाठी शहरात कार्यरत असल्याने पोलीस प्रशासनाने मरगळ झटकून आता ठोस कृती करणे अपेक्षित आहे. गुन्हेगारीकडे वळणार्या तरुणाईचे मनपरीवर्तन करण्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे असल्याचा सूर सुज्ञ नागरीकातून व्यक्त होत आहे.


