मोठी बातमी : 4 ऑक्टोबरपासून राज्यात शाळा सुरू होणार
मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला व ऑनलाईन शिक्षणावर भर देण्यात आला होता मात्र आता कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता त्यासोबत तिसर्या लाटेची शक्यता पाहता अनेक मोठ्या शहरात शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला. आता मात्र शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकराने नेमलेले तज्ज्ञ डॉक्टरांच्या चाइल्ड टास्क फोर्स सकारात्मक असून कोरोना स्थिती नियंत्रणमध्ये राहिल्यास दिवाळीनंतर शाळा सुरू करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला होता.
स्थानिक परीस्थितीनुसार होणार निर्णय
शाळा सुरू करण्यापूर्वी याआधी ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या आहेत त्याबाबतची तयारी शिक्षण विभागला करायची आहे. शाळेत सोशल डिस्टन्सिंग पाळणे, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचार्यांचे लसीकरण पूर्ण करणे, शाळा सॅनिटाइज करणे, शाळेत आरोग्य कक्ष तयार ठेवणे अशी तयारी शिक्षण विभागाला या दरम्यान पूर्ण करायची आहे. टास्क फोर्स किंवा राज्य सरकारच्या शाळा सुरू करण्याबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचना या जिल्हास्तरावर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पाळायच्या आहेत. त्यामुळे स्थानिक कोरोना परिस्थितीचा विचार करून त्यानुसार शाळा सुरू करण्याबाबतचा नियोजन जिल्हाधिकारी, आयुक्त यांच्या आदेशानुसार होईल. शिक्षण विभागाने लसीकरण पूर्ण झालेल्या शिक्षकांचा डेटा मागवला असून शाळा सुरू करण्याबाबतची तयारी सुरू ठेवली आहे. सोबतच मुंबई महापालिका शिक्षण विभाग सुद्धा शाळा सुरू करण्याबाबतच्या तयारीचा नियोजन करत असल्याचे सांगितले जात आहे.
