रामेश्वर कॉलनीत तलवारीच्या धाकावर दहशत : एकाला अटक
जळगाव : रामेश्वर कॉलनी भागातील सिद्धार्थ नगरात तलवार घेऊन दहशत पसरविणार्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सागर पूनम कंडारे (24, रा.सिद्धार्थनगर रामेश्वर कॉलनी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर कंडारे हा शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात हातात 30 इंच लांबीची लोखंडी तलवार घेऊन दहशत माजवत असल्याची गोपपीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख, पोलीस नाईक सुधीर साळवे, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, इमरान शेख यांनी रामेश्वर कॉलनीत रात्री 12.30 वाजेच्या सुमारास गस्तीवर असतांना संशयित आरोपी सागर कंडारे याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळून 30 इंच लांबीची लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल इम्रान बेग यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सागर कंडारे याच्याविरोधात रात्री 2 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
