चाळीसगावकरांवर पुन्हा पूर संकट : दुकानांमध्ये शिरले पाणी


चाळीसगाव : शहरासह तालुक्यात दमदार बरसलेल्या आभाळमायेमुळे शहरवासीयांवर पुन्हा पूराचे संकट कोसळले आहे. मंगळवारी पहाटे पाच वाजता तितूर व डोंगरी नदीला पाचव्यांदा पूर आल्यानंतर अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने पुन्हा व्यापार्‍यांना नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. चाळीसगाव तालुक्यात गत 24 तासात 445 मिमी पाऊस झाल्याने अतिवृष्टीमुळे उरल्या-सुरल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून बळीराजा संकटात सापडला आहे. मंगळवार अखेर 1102.13 मिलीमीटर पर्जन्यमान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. सातही मंडळांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. शहरात सखल भागही जलमय झाला असून व्यापारी संकुलांमध्ये पाणी शिरले आहे. गत 24 तासात गिरणा धरण क्षेत्रात 45 तर मन्याड परीसरात 75 मिमी पाऊस झाला आहे. गिरणा धरणातील जलसाठा 78 टक्क्यांवर पोहोचला आहे. मन्याड मधून पाच हजार तर जामदा बंधा-यातून 15 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. प्रशासनाने नदीकाठावरील गावांसह नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, माय-बाप सरकारने पंचनाम्याच्या सोपस्कारासोबत तातडीने मदत देण्याची अपेक्षाही शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !