जोंधनखेडा धरणाच्या पूर्णत्वासाठी जलसंपदा विभागाकडून 30.84 कोटी निधी मंजूर
जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांच्या पाठपुराव्याला यश
मुक्ताईनगर : युती शासनाच्या काळात पाटबंधारे मंत्री असताना एकनाथराव खडसे यांच्या प्रयत्नातून जोंधनखेडा गावाजवळ गोरक्षगंगा नदीवर कुंड धरणाची निर्मिती करण्यात आली होती. या धरणाच्या भिंतीची उंची वाढवावी व सांडव्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी असल्याने तसेच जिल्ह्यातील अन्य प्रकल्प मार्गी लागण्यासाठी जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे खेवलकर यांनी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्याकडे जळगाव जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरून नुकतीच मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनांची व प्रकल्पांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यात जोंधनखेडा लघू पाटबंधारे योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली असून या प्रकल्पास जलसंपदा विभाग दरसूची 2016- 17 वर आधारीत 30. 84 कोटी इतक्या किंमतीस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. दरम्यान, धरणाचे अपूर्ण असलेले काम पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातून धरणाच्या लाभ क्षेत्रातील शेतकरी बांधवांना लाभ होणार असल्याने शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
