साठवण तलाव कामात झालेल्या अपहाराची चौकशी करा
यावल शहरातील भाजपा पदाधिकार्यांची मागणी : दोषींवर कठोर कारवाई होण्याची अपेक्षा
यावल : नगरपालिकेच्या अतिरीक्त साठवण तलावाच्या बांधकामात मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहाराच्या नगराध्यक्ष यांनी केलेल्या आरोपाची वरीष्ठ स्तरावरून कसून चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी यावल तालुका भाजपाच्या वतीने बुधवारी भाजपा शहर कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परीषदेत करण्यात आली. नगराध्यक्षा नौशाद मुबारक तडवी यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेवून त्यांच्याकडे यावल नगरपालिकेने उभारलेल्या अतिरीक्त साठवण तलावाच्या कामात आर्थिक अपहार झाल्याची लिखीत तक्रार देत चौकशीची मागणी केली होती. नगराध्यक्षांनी केलेल्या भ्रष्टाचाचर चौकशीच्या मागणीस भाजपाने समर्थन केले आहे. या सर्व प्रकरणाची भाजपाने चौकशीची मागणी करीत दोषींवर कठोर कारवाईची मागणीही केली आहे.
विकासाचा केवळ गवगवा : भाजपाचा आरोप
शहर भाजपा कार्यालयात बुधवार, 29 सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, शहराध्यक्ष डॉ.निलेश गडे, गोपालसिंह पाटील, पी.एस.सोनवणे, अॅड.गोपाळ बारी, परेश नाईक यांनी संयुक्तिक घेतलेल्या पत्रकार परीषदेत गेल्या पाच वर्षांत शहराचा कोणताही विकास न करता सर्वानुमते केवळ विकासाचा गवगवा केल्याचा आरोप करण्यात आला तसेच यावल पालिकेने नव्याने उभारलेल्या साठवण तलावाच्या कामात एक कोटी 80 लाखांचा अपहार केल्याचा आरोप खुद नगराध्यक्षा नौशाद तडवी व पाच नगरसेवकांनी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केल्याने सर्वसामान्य जनतेचा संशय बळावला आहे.



जमिनीवर अतिक्रमण करीत तलावाचे काम
साठवण तलावाचे जागेचे मोजमाप न करणे, आराखड्यानुसार काम न करणे, कंत्राटदारास घाईघाईने बिले अदा करणे यामुळे भ्रष्टाचाराच्या संशयास वाव मिळत असल्याचीही पुष्टी पदाधिकार्यांनी यावेळी जोडली. साठवण तलावाच्या लगतच असलेल्या राकेश जगन्नाथ पाटील व पराग जगन्नाथ पाटील या दोन्ही बंधूची जमीन अतिक्रमित करून पालिकेने त्यावर साठवण तलाव उभारल्याने व शेतकरी बंधू याप्रकरणी न्यायालयात जाणार असल्याने पालिकेला न्यायालयीन लढ्यासाठी सामोरे जावे लागणार असल्याचे पदाधिकारी म्हणाले. विकास निधी हा जनतेचा पैसा असून यात झालेल्या अपहारासारख्या गंभीर प्रकरणाचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी तालुका भाजपच्या वतीने करण्यात आली.
