सुखी व शांत जीवन जगण्यासाठी आपणही बदललं पाहिजे’: प्रा. खुशाल कांबळे
चाळीसगाव ज्येष्ठ नागरीक संघाच्या वतीने ज्येष्ठांसाठी गुणदर्शन कार्यक्रम
चाळीसगाव : ज्येष्ठ नागरीक दिनाच्या निमित्ताने जेष्ठ नागरीक संघ चाळीसगावच्या वतीने ज्येष्ठ नागरीकांसाठी विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगाचार्य वसंतराव चंद्रात्रे होते. विमानतळावरील महाराणा प्रताप सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात, ‘काळ बदलला आहे, सुखी व शांत जीवन जगायचे असेल तर आपणही बदललं पाहिजे’, असे मत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा.खुशाल कांबळे यांनी मांडले. आपल्या पिढीने आई-वडील देव मानले त्यांचे ऐकले त्यांना मान दिला त्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घेतली. आज मात्र लहान असो की मोठा मुलगा असो, की मुलगी आई-वडिलांनी आपले ऐकले पाहिजे आपला अपमान करता कामा नये, अशी आई-वडीलाकडून अपेक्षा करतात. यावेळी प्रा.खुशाल कांबळे यांनी ‘आता कुरकुर करायचे नाही’ ही कविता सादर केली. विविध गुणदर्शनात रुक्मिणीबाई चौधरी यांनी गवळण सादर केली. गाय माय कवी सोमनाथ कासार, अॅड.निवृत्ती पाटील हातलेकर, निर्मला पवार, गायत्री चौधरी यांनी गीत गायन केले. प्रकाश चौधरीच्या बासरी वादनाने कार्यक्रमात रंग भरला. शीघ्र कवी रमेश पोतदारांनी काव्यगायन व सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक बळीराम झोपे यांनी केले. स्वागत गीत निर्मला पवारने सादर केले. अध्यक्ष वसंतराव चंद्रात्रे यांनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या व योग कार्याची माहिती दिली. नारायणराव भदाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला प्रल्हाद नवले, शामकांत पटवे, भाऊसाहेब मोरे , बाबासाहेब राजपूत, नारायण भदाणे उपस्थित होते.
