सहा वर्षीय अपहरण झालेल्या बालकाचा मृतदेह आढळला : नरबळीचा संशय !
कोल्हापूर : दोन दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या सहा वर्षीय बालकाचा मृतदेह कापशी येथे आढळल्याने शाहुवाडी परीसरात खळबळ उडाली. मयत बालकाच्या अंगावर जखमा आणि हळदी कुंकू असल्याने हा नरबळीचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त आहे. शाहूवाडी तालुक्यातील कापशी येथील आरव राकेश केसरे या सहा वर्षीय बालकाचे दोन दिवसापूर्वी अज्ञात व्यक्तीकडून अपहरण झाले होते. दोन दिवस शाहूवाडी पोलीस त्याचा शोध घेत होते. घराच्या दारात खेळत असताना त्या बालकास कुणीतरी फूस लावून पळवून नेले. त्यामुळे पोलीस गावातील विविध ठिकाणी त्याचा शोध घेत होते. मंगळवारी सकाळी आरव याचा मृतदेह घराच्या मागील बाजूस आढळला. त्याच्या अंगावर बर्याच ठिकाणी जखमा होत्या. याशिवाय हळदीकुंकूही लावल्याचे दिसत होते. यामुळे हा नरबळीचा प्रकार असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
नरबळीच्या संशयाने खळबळ
सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापुरातील सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. तेथून तो त्याच्या पालकांना देण्यात आला. हा नरबळी आहे की पोलीस यंत्रणेला चकवा देण्यासाठी मुद्दाम केलेली ही खेळी आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. कागल तालुक्यातील सावर्डे येथे महिन्यापूर्वी असाच प्रकार घडला होता. त्याबाबत अजूनही पोलिसांचा तपास सुरू आहे. तो तपास पूर्ण होण्यापूर्वीच वारणा कापशी खोर्यात नरबळीचा नवा प्रकार उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, कापशी येथे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतता आहे.
