जळगावात सट्ट्यावर धाड : दोघांना अटक
जळगाव : शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ टपरीच्या आडोश्याला सुरू असलेल्या सट्टा जुगारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवार, 5 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शामलाल चंदुमल कुकरेजा (62, रा.सिंधी कॉलनी) आणि जगन्नाथ काकडू महाजन (38, रा.धानोरा, ता.जि.जळगाव) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील गुजराल पेट्रोल पंपाजवळ बंद पडलेल्या टपरीच्या आडोश्याला काही जण मटका नावाचा सट्टा जुगार खेळत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील किरण धनगर, दीपक पाटील, प्रमोद लाडवंजारी यांनी मंगळवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर छापा टाकून संशयित आरोपींना ताब्यात घेतले. दोघांकडून साडे सहा हजारांची रोकड आणि जुगार खेळण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलीस नाईक किरण धनगर यांच्या फिर्यादीवरून दोघांवर सायंकाळी 5 वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

