पाटणादेवी जंगलात 50 वर्षीय गुराख्याचा धारदार शस्त्राने वार करीत खून
चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
चाळीसगाव :तालुक्यातील पाटणादेवी जंगलात गुरेढोरे सांभाळणार्या एका 50 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्याने चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (50, गणेशपूर, त.चाळीसगाव) असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
हात-पाय बांधत धारदार शस्त्राने खून : कारण गुलदस्त्यात
तालुक्यातील गणेशपूर येथील नाना उर्फ ज्ञानेश्वर संतोष पाटील (50) हे पाटणादेवी जंगलात गुरे-ढोरे सांभाळण्याचे काम करीत होते. नेहमीप्रमाणे ते गुरांना घेवून जंगलात गेल्यानंतर अज्ञात आरोपीने त्यांचे हात-पाय बांधून धारधार शस्त्राने डोक्याच्या मागच्या बाजूला वार करून निर्घृण हत्या केली. ही थरारक घटना मंगळवार, 5 ऑक्टोबर सकाळी 8:30 ते 6 ऑक्टोबर सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. खुनाच्या कारणाचा आम्ही शोध घेत असल्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे म्हणाले. निलेश ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे हे तपास करीत आहेत.



