नाशिक परीक्षेत्रातील विशेष पथकाची कारवाई : साडेचार लाखांची बिअर जप्त
शिरपूर : नाशिक परीक्षेत्रातील विशेष पथकाने सापळा रचून बाभळे फाट्यावर साडेचार लाखांची अवैध बियर पकडली. गुरुवार, 7 ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. बोराडी येथून समाधान पवार आणि बाळू पवार यांचे वाहन (एम.एच.19, एस-0038)अवैध बियरचे खोके घेऊन बाळदे मार्गे शिंदखेड्याकडे जाणार असल्याची गुप्त बातमी नाशिक परीक्षेत्रातील पोलीस निरीक्षक बी.जी. रोहम यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने चोपडा-शहादा रस्त्यावरील बाळदे फाट्याजवळ सापळा रचला. हे वाहन वाघाडी गावाकडून बाळदे फाट्याकडे येतांना दिसले. खात्री पटल्यानंतर पोलिसांनी या वाहनाला अडवताच वाहनाचा चालक पळून जाण्यात यशस्वी झाला. तर त्याच्यासोबत असलेला एकास पथकाने ताब्यात घेतले. रवींद्र देवचंद भिल आणि पळून गेलेल्या चालकाचे नाव बाळू उर्फ भय्या पवार (रा बोराडी) असे आहे. पथकाने गाडीतील मागील बाजूला तपासले असता गाडीच्या मधील कप्प्यात अवैध बियरचे खोके आढळून आले. जप्त केलेल्या साठ्यात किंगफिशर कंपनीचे बियरचे टिन असलेले एकूण 99 खोके होते. त्यात प्रत्येकी 24 नग 500 मिलीचे एकूण दोन हजार 376 नग प्रत्येकी 180 रुपये असलेल्या प्रत्येक टिनवर मध्य प्रदेशात विक्री असे लिहिलेले आढळून आले. नाशिक परीक्षेत्रातील विशेष पथकाचे पोलिस कर्मचारी अभिजित मोहन साबळे यांनी फिर्याद दिली आहे.
