भाडेकरूचा त्रास असह्य : घर मालकाची आत्महत्या
नागपूर : भाडेकरूचा त्रास असह्य झाल्याने मुकेशकुमार श्रीचंद रिजवानी ( ४६) या घर मालकाने आत्महत्या केली. जरीपटक्यात ही घटना घडली. गळफास लावण्यापूर्वी मृतकाने स्वत:चा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेमुळे शहरभर खळबळ उडाली आहे. नास्ता सेंटर चालविणाऱ्या रिजवानी यांनी आरोपी राजेश उर्फ राजा नामोमल सेतिया (4५) याला काही वर्षांपूर्वी दोन खोल्या भाड्याने दिल्या होत्या मात्र, ठरल्याप्रमाणे आरोपी राजेश मुकेश यांना घरभाडे देत नव्हता. त्याची मागणी केली असता तो शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत होता. त्याचा मोठा भाऊ वेगवेगळ्या विभागात तक्रारी करून रिजवानी यांना त्रास देत होता. वारंवार होत असलेल्या वादामुळे रिजवानी यांनी आरोपींना सप्टेंबर २०१९ मध्ये आपले घर खाली करून मागितले. यावेळी आरोपीने त्यांना घर खाली करून देण्यासाठी १० लाखांची खंडणी मागितली. रिजवानी यांनी आरोपी राजाला ६० हजार रुपये दिले. आणखी ४.५० लाख रुपये मिळावे म्हणून आरोपी राजा रिजवानी यांचा छळ करीत होता, तर राजाचा मोठा भाऊ मूलचंदही त्याला साथ देत होता. त्यांच्याकडून होणारा त्रास असह्य झाल्यामुळे ६ ऑक्टोबरला सायंकाळी गळफास लावून आत्महत्या केली. तत्पूर्वी रिझवानींनी स्वत:चा व्हिडिओ बनविला. त्यात आत्महत्येला आरोपी सेतिया बंधू जबाबदार असल्याचे म्हटले. रिजवानी यांनी त्यात एका वकिलाचेही नाव घेतले. हा व्हिडिओ शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर कशिश सुनील रिजवानी यांनी शनिवारी रात्री जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी आरोपी सेतिया बंधूविरुद्ध गुन्हा दाखल केला. ते फरार असून, ठाणेदार वैभव जाधव आणि द्वितीय निरीक्षक तृप्ती सोनवणे तसेच त्यांचे सहकारी आरोपींचा शोध घेत आहेत.
