धक्कादायक ! : जात पडताळणी समितीचे उपायुक्त दोन लाखांची लाच घेताना जाळ्यात


पुणे : जात प्रमाणपत्र पडताळणी करुन ते वैध करण्यासाठी ८ लाख रुपयांची लाच मागून प्रत्यक्षात १ लाख ९० हजार रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने उपायुक्ताला रंगेहाथ पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नितीन चंद्रकांत ढगे (४०) असे या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्ताचे नाव आहे. वानवडी येथील ढगे यांच्या निवासस्थानाजवळ शनिवारी रात्री रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागात नितीन ढगे हे उपायुक्त तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य आहेत. तक्रारदाराच्या पत्नीचे जात प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी अर्ज केला होता. ते प्रमाणपत्र वैध करण्याकरीता ढगे याने ८ लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यात ढगे यांनी तडजोड करुन २ लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तक्रारदार यांना ढगे यांनी पैसे देण्यासाठी वानवडीतील आपल्या निवासस्थानाजवळ बोलाविले होते. त्यानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून १ लाख ९० हजार रुपयांची लाच घेताना ढगे यांना पकडण्यात आले. वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानाची झडती घेण्याचे काम पहाटेपर्यंत सुरु होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !