वस्तीवर हल्ला चढवत दरोडेखोरांचा दोन महिलांवर सामूहिक अत्याचार
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील एका गावात दरोडेखोरांनी चोरीच्या उद्देशाने एका वस्तीवर हल्ला चढवल्यानंतर 23 व 30 वर्षीय सामूहिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. सात ते आठ दरोडेखोरांनी शेत वस्तीवर हल्ला चढवत पुरुषांना चाकू आणि कुर्हाडीचा धाक दाखवत त्यांना बांधून ठेवले तसेच कुर्हाडीच्या दांड्याने त्यांना जबर मारहाणही केली. त्यानंतर एका 23 वर्षीय आणि एका 30 वर्षीय महिलेवर चार दरोडेखोरांनी सामूहिक बलात्कार केला. यानंतर घरातली रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन दरोडेखोर पसार झाले. या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून पीडित महिलांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांची घटनास्थळी धाव
बीडकीनचे सहा.पोलीस निरीक्षक संतोष माने, फौजदार राहुल पाटील, जमादार तांगडे, बापू दंडगव्हाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात हलवले. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहूल, पोलीस अधीक्षक निमित गोयल व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीच्या शोधासाठी पोललिांना सूचना केल्या. श्वानपथक व ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने शेतवस्तीवर राहणार्या ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

