क्रुझ ड्रग्ज पार्टी प्रकरण : बॉलीवूड स्टार शाहरूख खान व आर्यनमध्ये 15 मिनिटे संवाद


मुंबई : जामीन न मिळाल्याने कारागृहात असलेल्या मुलगा आर्यनची बॉलीवूड स्टार शाहरुख खानने गुरुवारी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये सुमारे 15 मिनिटे संवाद झाला. शाहरुख खानसोबत तिची मॅनेजर पूजा ददलानीही उपस्थित होती. जेल पोलीस अधीक्षकानुसार, शाहरुख खान जेव्हा जेलमध्ये आला तेव्हा त्याचं आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रे तपासण्यात आली. त्यानंतर त्याला टोकनसह आतमध्ये पाठवलं. आर्यन-शाहरुख यांच्यात 15-20 मिनिटं संवाद झाला. चर्चेवेळी दोघांमध्ये काचेची भिंत होती. दोन्ही बाजूने इंटरकॉम होता. कुठल्याही सामान्य आरोपीच्या नातेवाईकांना भेटायला जातात तसं शाहरूखनं आरोपी आर्यनची भेट घेतली. त्याला कुठलीही विशेष ट्रिटमेंट दिली नाही. मुलाखतीची वेळ संपताच शाहरूख स्वत: बाहेर पडला.

शाहरूख म्हणाला : सर्व काही ठिक होईल
शाहरुख खान आणि आर्यनची भेट जेलच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील विजिटींग रुमजवळ झाली. शाहरुख खान आर्यनला पाहताच भावूक झाला होता परंतु स्वत:च्या भावनेवर नियंत्रण ठेवत शाहरुख गंभीर असल्याचं दाखवून देत होते. शाहरुख-आर्यन जेलच्या भेटीवेळी 5 अधिकारी उपस्थित होते. त्यात एक डेप्युटी जेलरही होता. शाहरुखने आर्यनला धीर देत म्हणाला की, जामीन मिळेल. प्रकरण हायकोर्टात आहे. सर्वकाही ठीक होईल. या भेटीवेळी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली. कोरोना काळात जेलमधील कैद्यांना भेटण्यावर बंदी होती. मात्र कोरोनाचे निर्बंध हळूहळू शिथील होत असल्याने 21 ऑक्टोबरपासून नियम बदलण्यात आले. शाहरुख खानला या बदललेल्या नियमांचा फायदा झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !