पूर्व वैमनस्यातून वाद : गोळीबारात वाळू व्यावसायीकासह दोघे ठार


लोणी काळभोर : पूर्व वैमनस्यातून झालेल्या वादानंतर झालेल्या गोळीबारात वाळू व्यावसायीकासह दोघे ठार झाले. ही घटना उरुळी कांचन येथे महामार्गावर शुक्रवारी भर दुपारी घडली. वाळू व्यावसायिक संतोष संपतराव जगताप (38, दहिटणे रोड, चव्हाणवाडी, माधवनगर, राहू, ता.दौड) व स्वागत बाप्पू खैरे (25, रा.दत्तवाडी, ऊरूळी कांचन, ता. हवेली) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. दरम्यान, गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

भर दिवसा गोळीबाराने खळबळ
मिळालेल्या माहितीनुसार राहू येथे बेकायदा वाळू उपश्यावरुन 2011 मध्ये तत्कालीन दौंड बाजार समितीचे संचालक गणेश सोनवणे व त्यांचे चुलत भाऊ रमेश सोनवणे यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्याचा आरोप संतोष जगताप याच्यावर होता. या प्रकरणात जामिनावर संतोष जगताप बाहेर होता. दरम्यान, शुक्रवारी दुपारी अडीच वाजता जगताप हे सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल सोनईसमोर थांबले होते. यावेळी अचानक आलेल्या सोनवणे गँगच्या चार ते पाच जणांनी जगताप व त्यांच्या अंगरक्षकावर घातक हत्याराने हल्ला चढवून गोळीबार सुरू केला. यात जगताप व दोन अंगरक्षक गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत जगताप यांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात खैरे जागीच ठार झाला तर उर्वरित संशयीत पळून जाण्यात यशस्वी ठरले. दरम्यान, जगताप, खैरे व जखमींना लोणी स्टेशन येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता संतोष जगताप यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले तर खैरे उपचार सुरू असताना मयत झाले. जगताप यांचे नातलग व मित्र हॉस्पिटलमध्ये जमा झाल्याने तेथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली.

 

  • नागपूर हादरले : 24 तासात दोघांचे निर्घृण खून


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !