पिस्तुलाचा धाकावर बँकेत दरोडा : दोन कोटींच्या सोन्यासह 31 लाख लंपास


पुणे-नगर रस्त्यावरील शिरूरच्या पिंपरखेडची घटना

पुणे : पुणे-अहमदनगर रस्त्यावरील शिरूर तालुक्यात पिंपरखेड येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत पाच जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकत दोन कोटींच्या सोन्यासह 31 लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, 21 रोजी भरदुपारी दीडच्या सुमारास घडल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर शिरूर पोलिसांनी नाकेबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला आहे.शिरूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत पिंपरखेड या गावात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा आहे. बँकेत गुरुवारी दुपारी पाच जण चेहर्‍यावर मास्क घालून घुसले. त्यानंतर त्यांनी बँक अधिकारी, कॅशियर व कर्मचार्‍यांना पिस्तुलाचा धाक दाखवून लॉकरमध्ये असलेले दोन कोटींचे सोने आणि 31 लाखांची रोकड बॅगेत भरून पळ काढला. ज्या वेळी बँकेत दरोडा पडला, त्या वेळी बँकेत 7 ते 8 ग्राहकही होते. मात्र, त्यांनाही दरोडेखोरांनी दमदाटी केली. त्यामुळे उपस्थित असलेल्या एकालाही काहीही हालचाल करता आली नाही.

लूटमार करून कारने दरोडेखोर फरार
दरोडा घातल्यानंतर सर्वजण कारमधून जांबूत गावाच्या दिशेने वेगात पसार झाले. त्यानंतर याबाबतची माहिती शिरूर पोलिसांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करत दरोडेखोरांचा तपास सुरू केला. शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी सांगितले की, एकूण पाच जणांनी पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेत चोरी केली. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्वजण दिसून येत असून त्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येईल.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !