ट्रक चालकाला मारहाण करून ट्रक लांबवणारे भामटे पोलिसांच्या जाळ्यात
लातूर : ट्रक चालकाला मारहण करीत ट्रक लांबवणार्या तिघांना लातूरच्या पोलीस पथकाने तेलंगणातून ट्रकसह ताब्यात घेतले. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.शहरातील रिंगरोड परिसरात असलेल्या एका ट्रान्सपोर्टनजीक थांबविण्यात आलेला ट्रक चालकाला मारहाण करुन पळविल्याची घटना 20 ऑक्टोबरला रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
या आरोपींना झाली अटक
फिर्यादी गुणाजी जयराम कोल्हे (43 रा. दाभाडी ता. किनवट जि. नांदेड) यांच्या मालकीचा ट्रक (एम.एच. 26 ए.डी. 1631) लातूर येथील रिंगरोड परिसरात चालक सुदाम पांडुरंग कळके (58 रा. कल्हाळ ता. जि. नांदेड) यांनी 20 ऑक्टोबर रोजी रात्री थांबविला होता. दरम्यान, रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास पांढर्या रंगाच्या कारमधून (एम.एच. 42 ए.एक्स. 4999) पाच जण तेथे दाखल झाले आणि ट्रकमध्ये घुसले. यावेळी चालकाला चाकूचा धाक दाखविला. दांड्याने मारहाण करत गाडीत जबरदस्तीने बसवून वाहन शिरुर ताजबंद, मुखेड, नरसी नायगाव येथे नेला. पुढे बिलोलीनजीक लोहगाव येथे चालकाला गाडीतून उतरविण्यात आले. मारहाण करुन शिवीगाळ करुन, तुझ्या मालकाला काही सांगितले तर तुला ठार मारू, अशी धमकी दिली. यानंतर ते तो ट्रक घेवून निघून गेले. पोलीस तपासात तेलंगणा राज्यात ट्रक गेल्याचा ठावठिकाणा लागला. याप्रकरणी शुक्रवारी ट्रकसह चालक पोशट्टी विठ्ठल बाशट्टीवार (39 रा. भैसा जि. निर्मल), मनोज सायलू जायेवार (29 रा. कुंडलवाडी) आणि राजू बबन चव्हाण (41 रा. कुंडलवाडी, ता. बिलोली जि. नांदेड) या तिघांना अटक करण्यात आली. त्यांना लातूरच्या न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

