अनैतिक संबंधातून जन्मलेल्या तीन महिन्यांच्या मुलीचा आईनेच केला खून
पुणे : अनैतिक संबंधातून जन्मलेल्या मुलीबाबत नातेवाईकांना काय सांगायचे या कारणावरुन आईनेच मुलीचा खून केला. येरवडा पोलिसांनी मुलीच्या आईला अटक केली असून 13 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलीस चौकशीत तीन महिन्याच्या मुलीचे घरातून अपहरण झाल्याची तक्रार करणार्या आईनेच आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला व त्यानंतर 13 वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत भरुन बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
तीन महिन्यांच्या मुलीला पळवून नेल्याची केली होती तक्रार
ही महिला मुळची अहमदनगरची असून मागील काही महिन्यांपासून ती येथे आपल्या भावाकडे चित्रा चौकात रहायला आली आहे. ती घटस्फोटीत असून तिला एक 13 वर्षाचा मुलगा आहे. 3 महिन्यांपूर्वी तिने एका मुलीला जन्म दिला होता. शुक्रवारी सायंकाळी घरात झोपले असताना आपल्या 3 महिन्याच्या मुलीला कोणीतरी पळवून नेल्याची तिने येरवडा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन चौकशीस सुरुवात केली. सायंकाळच्या वेळी ती झोपल्याचे सांगत होती. ती व तिच्या मुलाच्या बोलण्यात विसंगती दिसून आल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय वाढला. चौकशीदरम्यान महिलेने ही मुलगी सतत रडत होती. रात्र रात्र जागवायची. अनैतिक संबंधातून तिचा जन्म झाला होता. मुलीबाबत नातेवाईकांत काय सांगायचे, यामुळे आपणच तिचे तोंड दाबून तिला जीवे ठार मारले व तिच्याच 13 वर्षाच्या मुलाच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत बांधून बंडगार्डन पुलावरुन नदीत फेकून दिला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने नदीत जाऊन शोध घेतल्यावर त्यांना तिचा मृतदेह आढळून आला. तो शवविच्छेदनाकरीता ससून रुग्णालयात पाठवून दिला. या अपहरणाच्या गुन्ह्यात मुलीची आईला अटक केली असून तिच्या 13 वर्षाच्या मुलाला ताब्यात घेतले असल्याचे सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव यांनी सांगितले.

