लालपरीचा प्रवास महागला : आजपासून 17.17 टक्के भाड्यात वाढ
मुंबई : ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीचा प्रवास वाढत्या इंधन दरामुळे आता महागला आहे. एसटी महामंडळाने गेल्या तीन वर्षांनंतर प्रथमच 17.17 टक्के भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ महामंडळाच्या सर्व प्रकारच्या प्रवासी वाहतूक सेवांना लागू होणार आहे. 25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून ही भाडेवाढ होणार असून ती किमान 5 रुपयाने वाढणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली आहे.
इंधन दरवाढीमुळे एस.टी.चा प्रवास महागला
इंधनाच्या दरात झालेली भरमसाठ दरवाढ, टायरच्या तसेच गाड्यांच्या सुट्या भागांच्या वाढलेल्या किमतींमुळे एसटी महामंडळाच्या तिजोरीवर पडलेला भार कमी करण्यासाठी एसटी महामंडळाकडे भाडेवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता. भाडेवाढीचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी तयार करण्यात आला होता, मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. सोमवारी मंजुरी मिळाल्याने निर्णय लागू करण्यात आला आहे.

अशी असेल भाडेवाढ
नव्या तिकिट दरवाढीनुसार साधी गाडी, शयन-आसनी, शिवशाही तसेच शिवनेरी व अश्वमेधच्या पहिल्या टप्प्यासाठी भाडेवाढ होणार नसून दुसर्या टप्प्यानंतर म्हणजेच 6 किमी नंतर तिकिटाच्या दरात वाढ होणार आहे. ही दरवाढ 5 रुपयाच्या पटीत असून 25 ऑक्टोबर 2021 च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
