धक्कादायक ! : डोक्यावर टपली मारल्याच्या रागातून चौघांनी केला 15 वर्षीय विद्यार्थ्याचा खून
ठाणे : डोक्यावर मारल्याच्या रागातून ठाण्याच्या राजश्री शाहू महाराज विद्यालयातील 15 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली. तुषार साबळे (15, रा. ज्ञानेश्वरनगर, वागळे इस्टेट, ठाणे) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून चौथ्याचा शोध सुरू असल्याचे वागळे इस्टेट पोलिसांनी सांगितले.
क्षुल्लक कारणावरून विद्यार्थ्याची हत्या
वागळे इस्टेट ज्ञानेश्वरनगर परिसरातील राजश्री शाहू महाराज विद्यालयात मंगळवारी सकाळी दहावीची चाचणी परीक्षा होती. वर्ग भरल्यानंतर किरकोळ कारणावरून तुषार याच्यासह त्याच्या काही मित्रांनी आधीचा वाद उकरून काढला. सोमवारी दुपारी चार ते पाच जणांच्या दोन गटामध्ये टपली मारण्यावरून वाद निर्माण झाला होता. हाच वाद मंगळवारी पुन्हा उफाळून आला. तेव्हा दहावी ब तुकडीतील तुषार यामध्ये मध्यस्थी करण्यासाठी गेला. तेव्हा त्यानेच टपली मारल्याचा समज झाल्याने त्याच्या छातीवर दहावी अ तुकडीतील एकाने चाकूने वार केले. त्याच वेळी त्याच्या अन्य तीन साथीदारांनीही त्याला मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या तुषारला तातडीने जवळच्याच एका खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, शालेय विद्यार्थ्यांमधील या हाणामारीच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

