तरुणाची भर रस्त्यात हत्या : बाप-लेकांसह तिघांना अटक
भिवंडी : चायनीज गाडीवरील पैश्याचा गल्ला पळविण्याच्या वादातून चायनीज गाडीच्या मालकासह 5 जणांच्या टोळक्याने 32 वर्षीय तरुणाची भररस्त्यात हत्या केली. ही घटना सोमवारी रात्री उशिरा वंजारपट्टी नाका परीसरातील मेट्रो हॉटेलजवळ असलेल्या चायनीजच्या गाडीवर घडली. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पाच जणांना अटक करण्यात आली. रफिक मेहबूब शेख (32, रा.म्हाडा कॉलनी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अफजल नूरमोहम्मद सिद्धीकी (27), अफसर नूरमोहम्मद सिद्धीकी (26), मो.बशीर अन्सारी (28) ,नूर मोहम्मद मकदूमबक्ष सिद्धीकी उर्फ पुरीभाजीवाला उस्ताद (64) असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. विशेष म्हणजे आरोपीमध्ये तिघा बाप लेकांचा सहभाग असून तिघेही भिवंडीतील नदीनाका भागात राहणारे आहेत. तर आरोपीमध्ये एक साडे चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
मारहाणीत तरुणाचा मृत्यू
आरोपी अफजल नूर मोहम्मद याचे वंजार पट्टीनाका परीसरात मेट्रो हॉटेलजवळ असलेल्या अबूजी बिल्डिंग समोर चायनीजची गाडी आहे. या गाडीवर सोमवारी रात्री उशिरा मृतक शफिक हा आला, त्यावेळी त्याने चायनीज गाडीवरील काम करणार्या कारागिराशी वाद घातला. त्यांनतर गाडीवरील पैश्याचा गल्ला पळविला असता, पाचही आरोपींनी मृत शफिकला रस्त्यावरच पकडून त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर शफिकला भिवंडीतील स्व.इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले यामुळे मृतक शफिकच्या नातेवाईकांनी घटनास्थळी एकच गोंधळ घातला.

